पोयनाडात हनुमान जयंती उत्साहात
कीर्तन, पालखी सोहळे व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण
पोयनाड, ता. २ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात विविध गावांमध्ये गुरुवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त कीर्तन, आरती, पाळणा, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. विविध कीर्तनकारांनी नारदीय परंपरेतून हनुमान जन्मोत्सवाचे आख्यान सादर केले. घसवड येथे हभप अमित म्हात्रे तर भाकरवड येथे हभप ज्ञानेश्वर निळकर यांनी कीर्तन सादर केले. पेझारी येथील जागृत म्हसोबा देवस्थान येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांनी विविध हनुमान मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. सायंकाळी अनेक गावांमध्ये पालखी सोहळ्यांनी उत्सवाला भक्तिमय वातावरण लाभले.
छायाचित्र :
पोयनाड : धामणपाडा येथे हनुमान जयंतीनिमित्त नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.