आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील त्यांची उपयोगिता सिद्ध करतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधी यश मिळतं, कधी माणूस अपयशी होतो. कधी जय होतो तर कधी पराभवाचा सामना देखील करावा लागतो. परंतु माणसाचा स्वभावच असा आहे की, तो जय मिळाला की विजयाच्या आनंदात हुरळून जातो आणि जर पराभव झाला तर खचून जातो. मात्र असं न करता दोन्ही स्थिती जो माणूस संयमाने हाताळतो तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य पुढे आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात सर्वात शक्तिशाली गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे व्यक्तीचं मूल्य. जो व्यक्ती आपले मूल्य ओळखतो तो त्याच्या आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही. ज्या व्यक्तीला समाजामधील आपली किंमत माहिती असते, जो समाजामधील आपलं मूल्य जाणतो, तो व्यक्ती आपल्या प्रत्येक लढाईत विजयी होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. ज्या व्यक्तीला आपलं मूल्य माहीत असतं, अशा व्यक्तीची निर्णयक्षमता देखील उत्तम असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
वेळेचं महत्त्व – चाणक्य म्हणतात या जगात आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे वेळ, वेळ ही अशी गोष्ट आहे, जी एकदा हातातून गेली की पुन्हा परत कधीही येत नाही. जर तुम्ही योग्य वेळेला योग्य कामे केली नाहीत तर तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे माणसाने वेळेला किंमत दिली पाहिजे, कामं वेळेच्या वेळी केली पाहिजे. जो व्यक्ती वक्तशीर असतो, तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)