नैना प्रकल्पाबाबत सिडकोचे सकारात्मक संकेत
विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल, ता. २ (बातमीदार) ः पनवेल-उरण परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी महत्त्वाचा विषय असलेल्या ‘नैना’ प्रकल्पासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. विधान भवनात लक्षवेधी मांडल्यानंतर, या विषयावर मुंबईतील सिडको निर्मल भवन येथे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बाधित घरांचे नियमितीकरण, शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरेखित ४० टक्के प्लॉट, गार्डन व ओपन स्पेस आरक्षणांचे स्थलांतर, गावठाण लगतच्या बांधकामांना युडीसीपीआरअंतर्गत सवलती, पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआय आणि रस्त्यात बाधित बांधकामांना मोबदला व पुनर्वसन या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
बैठकीत लवकरच निर्णयप्रक्रियेला गती मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या घडामोडींमुळे स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या बैठकीस कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.