तुळजापूर - तुळजाभवानी मातेची चैत्री पौर्णिमा यात्रा गुरुवारी (ता. दोन) भक्तिभावाने, उत्साहात झाली. दिवसभरात सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
यात्रेसाठी बुधवारपासूनच (ता. एक) भाविक शहरात दाखल होऊ लागले होते. परिवहन महामंडळाच्या बस, खासगी वाहनांनी आज पहाटेपासून दिवसभर भाविक मोठ्या संख्येने येत होते. त्यामुळे मंदिरासह शहर गजबजून गेले. अनेक भाविकांनी आपल्या घरातील देवीच्या मूर्ती सोबत आणल्या. महाद्वारापाशी आल्यानंतर असे भाविक मूर्ती डोक्यावर घेऊन सवाद्य मिरवणुकीने मंदिरात जात होते.
भाविकांकडून दिवसभर देवीची पूजा, आरती आदींसह विविध धार्मिक विधी सुरू होते. दर्शनासाठी रीघ लागली होती. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक येरमाळा (जि. धाराशिव) येथील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत होते. दरम्यान, यात्रेनिमित्त शहरात मोठी आर्थिक उलाढाल झाली.
दर्शनासाठी ‘खेटा’
प्रत्येक पौर्णिमेस दर्शन घेण्यासाठी भाविकांचा खेटा असतो. त्यानुसार अनेक भाविक नित्यनेमाने पौर्णिमेस तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. तृतीयपंथी भाविकही दर्शनासाठी आवर्जून येतात. तुळजाभवानी मातेशिवाय अन्य देवींची रूपे सजवून वाजतगाजत मंदिरात येणाऱ्यांंची संख्याही मोठी असते.