जायकवाडी - पैठण शहरातील संत एकनाथ गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. शहराची लोकसंख्या ४५ हजारांच्या आसपास असून, संत एकनाथ एजन्सीकडे तब्बल २७ हजार गॅस कनेक्शन आहेत. सध्या दररोज ३ हजार सिलिंडरची मागणी असताना एजन्सीला केवळ ४५० सिलिंडरचा (एक ट्रक) पुरवठा होत आहे.
होम डिलिव्हरी बंद असल्याने आणि गॅसचा पुरवठा घटल्याने गुरुवारी (ता. २) भर उन्हात गॅस मिळवण्यासाठी महिला व नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रांगेतील गोंधळामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. सिलिंडर टंचाईमुळे पहाटेपासूनच नागरिक उपाशीपोटी रांगेत उभे राहत आहेत.
उन्हात तासन्तास उभे राहूनही गॅस मिळेल याची शाश्वती नसल्याने गोंधळ उडत आहे. रांगेत घुसखोरीवरून होणाऱ्या वादावादीमुळे काही काळ बुकिंग थांबवावे लागले होते. अखेर पैठण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पावती देणे सुरळीत झाले. तहसीलमधील पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांनी केला. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने वितरण व्यवस्था हाती घ्यावी!
जिल्हा प्रशासनाचे आदेश असतानाही पैठणमध्ये गॅसची घरपोच सेवा अद्याप बंदच आहे. यामुळे एजन्सीवर मोठी गर्दी उसळत असून रोजच वाद होत आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी येथे कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त तैनात करावा आणि प्रशासनाने वितरण व्यवस्था स्वतःच्या हाती घेऊन ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
सध्या दररोज तीन हजार ग्राहकांची मागणी आहे, मात्र कंपनीकडून केवळ ४५० टाक्यांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ग्राहकांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो. कंपनीने जाचक अटी शिथिल कराव्यात.
- उमेश परदेशी, व्यवस्थापक, संत एकनाथ गॅस एजन्सी
घरी गॅस सिलिंडर संपलेला आहे. त्यामुळे रांगेत आहे. पण सकाळपासून उन्हात उभे राहूनही सिलिंडर मिळेल याची खात्री नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला केवळ ४५० सिलिंडर देणे हा अन्याय आहे. महिला, ज्येष्ठांचे प्रचंड हाल होत आहेत.
- राजू जाधव, अरुणा सूर्यनारायण, त्रस्त ग्राहक
ऑनलाइन नोंदणीनंतर एका टाकीसाठी २५, तर दोन टाक्यांसाठी ४५ दिवसांचा कालावधी आहे. कंपनीकडून येणारा पुरवठा मर्यादित असला तरी, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे.
- कैलास बहुरे, पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय, पैठण