Ashok Kharat Arrest SIT Investigation : लग्नाचं आमिष दाखवून उच्चशिक्षित महिलेवर अत्याचार, पीडिता राहिली गर्भवती; भोंदू खरातचं काळं कृत्य वाचून संताप अनावर होईल!
esakal April 03, 2026 02:45 PM

नाशिक : महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरात यास गुरुवारी (ता. २) अत्याचाराच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक करीत जिल्हा न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. भोंदू खरातने उच्चशिक्षित पीडितेला लग्न करण्याचे आणि तिच्या मुलांनाही स्वीकारण्याचे आमिष दाखवून अत्याचार (Nashik Fake Godman Arrest) केला. पीडिता गर्भवती राहिली असता, गोळ्या देत तिचा गर्भपातही केला.

यात शहरातील काही डॉक्टरांचा भोंदू खरातशी संबंध असल्याचे तपासातून समोर येत असल्याने ते डॉक्टर ‘एसआयटी’च्या रडारवर आहेत. पीडितेकडून त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड ही महत्त्वाची कागदपत्रे घेतल्याने त्याचा त्याने गैरव्यवहारासाठी वापर केल्याची शक्यता सरकार पक्षाने वर्तविली. त्या अनुषंगाने न्यायालयाने भोंदू खरातला येत्या ८ तारखेपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात भोंदू अशोक खरातला लैंगिक अत्याचारासह गर्भपाताच्या दुसऱ्या गुन्ह्यात ‘एसआयटी’ने बुधवारी (ता. १) दुपारी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ताब्यात घेतले. हे प्रकरण दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत असल्याने न्यायालयात भोंदू खरातला आणणे त्याच्या जीविताला धोका उत्पन्न होण्याची शक्यता ‘एसआयटी’ने व्यक्त करीत या प्रकरणातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी, असा विनंती अर्ज न्यायालयाकडे केला होता.

Ashok Kharat Case in Nashik : भोंदू खरातचे काळे कारनामे! गर्भपाताच्या गोळ्या देणारे डॉक्टर आता SIT च्या रडारवर, फॉरेन्सिकच्या अहवालाची प्रतीक्षा

मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती बी. एन. ईचपुराणी यांनी त्या अर्जाची दखल घेत मान्यता दिली. त्यानुसार, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास व्हीसीद्वारेच भोंदू खरातला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायदान कक्षात चार मोठ्या आकाराच्या स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. तर, ‘एसआयटी’चे तपासी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, सहायक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांच्यासह बचावपक्षाचे ॲड. सचिन भाटे हे प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते.

गर्भपात कुणाच्या सल्ल्याने..?

भोंदू खरात यास लैंगिक अत्याचारासह बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या सरकारवाडा पोलिसांत दाखल दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली असता गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पीडिता उच्चशिक्षित असून, स्पर्धा परीक्षेसाठी दिल्लीतही होती. तत्पूर्वीच कुटुंबीयांबरोबर ती भोंदू खरातकडे गेली असता, त्याने पीडितेला २०१३ मध्ये घटस्फोट होईल, असे सांगितले होते. नेमके तसेच झाले. त्यानंतर काही वर्षांनी ती खरातकडे गेली असता, त्याने तिला लग्नाचे आणि तिची मुले सांभाळण्याचे आश्वासन देत तिच्यावर लैंगिंक अत्याचार केले.

यात ती गर्भवती राहिली असता तिला गोळ्या देत गर्भपातही केला. यात तिला प्रचंड त्रासही झाल्याचे सहायक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयास सांगितले. भोंदू खरातने दिलेल्या गर्भपाताच्या गोळ्या कोठून घेतल्या, त्याचा शोध ‘एसआयटी’ला घ्यायचा असल्याचे सांगत कोठडीची मागणी केली.

खरातच्या वकिलांचा तीव्र विरोध

'एसआयटी'ने भोंदू खरातला सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असता, त्यास खरातचे वकील सचिन भाटे यांनी तीव्र विरोध केला. खरात यास अटक करण्यात आलेल्या गुन्ह्याची फिर्याद मिळालेली नसल्याचे सांगत ॲड. भाटे यांनी, खरात यास यापूर्वीच १४ दिवसांची पोलिस कोठडी पूर्ण झाली आहे. यादरम्यान त्याच्या कार्यालय, घराची झडती घेण्यात आली. तपासाच्या नावाखाली खरातला त्रास दिला जात असल्याचे सांगत तीव्र विरोध केला. वादी-प्रतिवादींच्या युक्तिवादानंतर न्या. श्रीमती बी. एन. ईचपुराणी यांनी भोंदू खरात यास ८ तारखेपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ न्यायाधीश दरडावले

भोंदू खरात यास न्यायालयासमोर ‘व्हीसी’द्वारे हजर केले असता, न्यायधीशांनी त्याला नाव विचारले. त्या वेळी त्याने हळू आवाजात उत्तर दिले असता, ‘मोठ्याने बोल... ’ असे न्यायाधीश दरडावले. त्यामुळे भोंदू खरात याने हात जोडून त्याचे नाव सांगितले. शेवटी त्याला काही बोलायचे आहे का, असे विचारले असता त्याने ‘काही नाही...’ असे सांगितले. खरातच्या वकीलपत्रावर ॲड. भाटे यांची स्वाक्षरी नसल्याने न्यायालयाने खरातला ‘ॲड. भाटे तुमचे वकील आहेत का?’ असे विचारले असता त्याने होकारार्थी उत्तर दिले.

महत्त्वाच्या घडामोडी
  • साडेअकराच्या सुमारास भोंदू खरात व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर

  • न्यायाधीश भोंदू खरातवर दरडावले

  • सरकार पक्षाचे ॲड. शैलेंद्र बागडे यांनी केला युक्तिवाद

  • पीडितेकडून आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले

  • या कागदपत्रांचा गैरवापर केला असावा

  • भोंदू खरातचे तपासात असहकार्य

Who is Sanjita Mohapatra? : सत्यम गांधींची तडकाफडकी बदली! आता 'या' डॅशिंग महिला अधिकारी सांभाळणार सांगली महापालिकेचा कारभार आधारकार्ड, पॅनकार्डच्या गैरवापराची शक्यता

भोंदू अशोक खरात प्रकरणाचे तपासाधिकारी व ‘एसआयटी’चे उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी, खरातने पीडितेकडून तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड घेतले आहे. या कागदपत्रांचा त्याने गैरवापर केल्याची शक्यता आहे. त्याने अनेक गैरव्यवहार केले असून, त्यासाठीही त्याने या कागदपत्रांचा वापर केल्याची शक्यता आहे. तसेच, त्याच्याकडे येणाऱ्या पीडितांच्या नातलगांकडूनही त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड घेतल्याचे तपासातून समोर आले. त्याचा शोध एसआयटी घेत असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट करण्यात आले. तर, खरात तपासात सहकार्य करीत नसल्याचेही नमूद करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.