35287
शेतकऱ्यांवर अन्याय, तर आंदोलन
साईप्रसाद काणेकर : ‘शक्तिपीठ’बाबत ठाकरे सेनेची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत ठाकरे शिवसेनेने स्पष्ट भूमिका मांडत विकासाला पाठिंबा दर्शवला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार असेल, तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. ठाकरे शिवसेनेचे बांदा शहरप्रमुख तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.
काणेकर म्हणाले, ‘‘शक्तिपीठ महामार्ग व विकासाला आमचा मुळीच विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांना विस्थापित करून त्यांचा उदरनिर्वाह हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. हा प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल, तर तो अन्यायकारक ठरेल. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पर्यायी व्यवस्था न देता जबरदस्तीने जमीन संपादन केली जाणार असेल, तर ठाकरे शिवसेना गप्प बसणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरू. स्थानिक शेतकऱ्यांसोबत मोठे जनआंदोलन उभे करून सरकारला निर्णय मागे घ्यायला भाग पाडू.’’
--
प्रशासनाला आवाहन
काणेकर म्हणाले, ‘‘विकासकामे करताना स्थानिकांच्या भावना, उपजीविका आणि हक्क यांचा आदर केला पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात या विषयावर तीव्र संघर्ष उभा राहील.’’ दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या गावांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गात नाराजी वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.