दुकानावर पुन्हा दगड कोसळला
कासा, ता. ४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेला २ एप्रिलपासून सुरुवात झाली. यात्रेच्या काळात गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या वेळी गडावरील मंदिर परिसरात पुन्हा एकदा दगड कोसळल्याची घटना घडल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता. ३) मंदिर परिसरातील एका दुकानावर मोठा दगड कोसळून नुकसान झाले. दगड कोसळताना दुकानदार दुकानातच होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरीही या घटनेमुळे संभाव्य मोठ्या दुर्घटनेचा धोका अधोरेखित झाला आहे. महालक्ष्मी गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील परिसरात काही वर्षांपासून दगड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. २०२२ मध्ये मोठे दगड कोसळून तीन दुकानांचे नुकसान झाले होते. तसेच ऑगस्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.