दुसरं काहीच नाही, फक्त नोटांचा पाऊसच, शनिवारच्या दिवशीही धुरंधरची धुंवाधार कमाई; संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती कमावले?
Tv9 Marathi April 04, 2026 09:45 PM

Dhurandhar 2 Box Office Day 17 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा Dhurandhar 2 हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर तुफान धडाकेबाज कामगिरी करत आहे. या चित्रपटाने गेल्या दोन आठवड्यांमध्ये शानदार कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट तिसऱ्या वीकेंडमध्ये प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे, इतक्या दिवसांनंतर देखील या चित्रपटाची कमाई कमी झालेली नाही. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

‘धुरंधर 2’ ने रिलीजच्या 16व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी पुन्हा एकदा जबरदस्त कलेक्शन करत सर्वांना आश्चर्यचकित केले. या दिवशी चित्रपटाने सुमारे 13,330 शोमधून तब्बल 21.55 कोटी रुपयांची कमाई केली. यासह 16 दिवसांमधील या चित्रपटाचे एकूण नेट कलेक्शन 959.37 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन 1148.58 कोटी रुपये झाले आहे.

17व्या दिवशीही जोर कायम

तिसऱ्या वीकेंडमुळे 17व्या दिवशीही चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार, 17व्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या चित्रपटाने 12.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अंतिम आकडेवारी रात्री उशिरा स्पष्ट होईल. तिसऱ्या शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत धुरंधर 2 चित्रपटाची ऑक्यूपेंसी 23.9% इतकी नोंदवली गेली आहे, जी या टप्प्यावर चांगली मानली जाते.

वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी

Dhurandhar 2 ने जगभरात देखील मोठ्या प्रमाणात कमाई करत एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. 16व्या दिवशीच या चित्रपटाने 1500 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. परदेशात चित्रपटाने 16व्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई केली असून, एकूण विदेशी ग्रॉस कलेक्शन 375 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे चित्रपटाचे एकूण जागतिक ग्रॉस कलेक्शन 1523.58 कोटी रुपये झाले आहे.

दरम्यान, रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट आणखी मोठी कमाई करू शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.