इमारतीच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला
esakal April 06, 2026 09:45 PM

पारगावच्या आरोग्य केंद्राला मुहूर्त
महाराष्ट्रदिनी रुग्णांच्या सेवेत, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मनोर, ता. ६ (बातमीदार) ः पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी उद्घाटन होणार आहे. या केंद्रामुळे पालघर तालुक्यातील सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील डोंगराळ भागातील रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे.
पारगाव परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांकडून मागणीचा पाठपुरावा केला जात होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर यांच्या माध्यमातून पारगाव आरोग्य केंद्रास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले होते. फेब्रुवारीत इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. या केंद्रासाठी एक कोटी ४३ लाखाची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सहा महिन्यांत इमारती बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन होते, पण नऊ महिन्यांचा कालावधी लागला आहे.
--------------------------
सुविधांनी परिपूर्ण
- पालघर जिल्ह्यात पारगाव, धुंदलवाडी, धानीवरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती पायलट प्रोजेक्ट अंतर्गत प्री कास्ट मटेरियलचा वापर करून बांधल्या जात आहे.
- नवीन इमारतीत वैद्यकीय कक्ष, औषध वितरण कक्ष, स्त्री व पुरुष रुग्ण कक्ष, प्रयोगशाळा, आपत्कालीन कक्ष तसेच उपाहारगृह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.