निकृष्ट गटारकामामुळे संताप
कंत्राटदारावर कारवाईची मागणी; मिलापनगरमधील रहिवासी आक्रमक
डोंबिवली, ता. ६ : शहरातील एमआयडीसी निवासी क्षेत्रातील मिलापनगर परिसरात सुरू असलेल्या गटार आणि रस्ते बांधकामातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ‘मिलापनगर वेलफेअर असोसिएशन’ने एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, गटारांचे बांधकाम अत्यंत शास्त्रीय आणि अव्यवस्थित पद्धतीने सुरू आहे. कामात अनेक त्रुटी दिसून येत आहेत. गटारे सरळ रेषेत न बांधता ‘झिगझॅग’ पद्धतीने बांधली जात आहेत. गटारांच्या रुंदीत एकसारखेपणा नसल्याने भविष्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच कोणत्याही नियोजनाशिवाय सिमेंट काँक्रीटचे रस्ते वारंवार तोडले जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कंत्राटदाराचे पर्यवेक्षक किंवा एमआयडीसीचे अधिकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून, यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करून गुणवत्ता तपासली जावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
अपघातांची मालिका
कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे गेल्या काही दिवसांत परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. २ एप्रिल रोजी काम सुरू असताना मुख्य गॅस पाइपलाइनला धक्का लागल्याने गळती झाली होती. त्याच दिवशी विजेची केबल तुटल्याने संपूर्ण परिसरात तब्बल ठ तास अंधार होता. कामाच्या ठिकाणी खोल खड्डे आणि राडारोड्याचे ढीग असूनही कोणतीही सुरक्षा यंत्रणा किंवा बॅरिकेडिंग लावलेले नाही.
आंदोलनाचा इशारा
कामाच्या ठिकाणी तातडीने प्रभावी देखरेख यंत्रणा कार्यान्वित करावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कामाची फेरतपासणी करावी, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.