संक्षिप्त-''वायफाय कॅमेरा दुकानात बसवा''
esakal April 06, 2026 09:46 PM

''वायफाय कॅमेरा
दुकानात बसवा''
ओटवणेः सावंतवाडी शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांना तपासात मदत होण्यासाठी आणि स्वत:च्या दुकानाची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रत्येक व्यापार्याने महागड्या यंत्रणेला स्वस्त पर्याय म्हणून आपल्या दुकानाबाहेर केवळ अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये उत्तम दर्जाचा सिंगल वायफाय कॅमेरा बसवावा, असे आवाहन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे. व्यापार्यांनी सुरक्षेबाबत तडजोड न करता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
....................
रेडीत आजपासून
नाट्य महोत्सव
सावंतवाडी ः माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त प्रीतेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणि दशावतार कलाप्रेमी, रेडी आयोजित भव्य दशावतार नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये उद्या (ता. ७) चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण ''देवेन नाईक प्रस्तुत) यांचा ''धुंडिराज गणेश'', बुधवारी (ता. ८) दत्तमाऊली नाट्यमंडळ सिंधुदुर्ग यांचा ''मार्जार'', गुरुवारी (ता. ९) चेंदवण पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ (सुधा दळवी प्रस्तुत) यांचा ''कालसर्प तांडव'', शुक्रवारी (ता. १०)खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा ''इंद्रजित वध'', शनिवारी (ता. ११) सिध्देश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कसई यांचा ''मायावी दुमती'', रविवारी (ता. १२) श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ पावशी यांचा ''भक्तांची पाठिराखी आदिमाया'' असे नाट्यप्रयोग होणार आहेत.
........................
बांगीवाडा येथे १४ ला
डॉ. आंबेडकर जयंती
मालवण ः बांगीवाडा समाज मंदिर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव १४ ला आयोजित केला आहे. यात ९ वाजता धम्मवंदना व अभिवादन कार्यक्रम, १० वाजता ''एक वही एक उपक्रम'', सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा, ८ वाजता जिल्हा बुद्ध भीमगीते ग्रुप डान्स स्पर्धा होईल. उपस्थित राहण्याचे आवाहन बांगीवाडा अध्यक्ष वैभव वळंजू यांनी केले आहे.
........................
काँग्रेसची उद्या
कुडाळ येथे बैठक
वेंगुर्ले ः राष्ट्रीय काँग्रेसची बैठक बुधवारी (ता. ८) एमआयडीसी रेस्टहाऊस, कुडाळ येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेसचे निरीक्षक दानिश अब्रार हे ''सृजन संघटन'' अभियानाकरिता १५ एप्रिलपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेले निरीक्षक हुसेन दलवाई, शशांक बावचकर, अजिंक्य देसाई असणार आहेत. या दौर्याचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय आबोसी विभाग, आबोसी विभाग, अल्पसंख्याक विभाग व इतर सेलचे सर्व अध्यक्ष, लोकसभा व विधानसभेचे उमेदवार, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष विलास गावडे यांनी केले आहे.
.........................

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.