सांगली हादरली! एकाच दिवसात 3 जणांची हत्या, दिवसाढवळ्या पडला रक्ताचा सडा
Tv9 Marathi April 07, 2026 12:45 AM

राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये काहीसी वाढ झाल्याचे चित्र आहे. सांगली जिल्हा पुन्हा एकदा रक्तरंजित घटनांनी हादरला आहे. अवघ्या 24 तासांत 3 निर्घृण खून झाल्याने जिल्ह्यात भीतीचं सावट पसरलं असून, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे.पहाटेपासून रात्रीपर्यंत घडलेल्या या 3 वेगवेगळ्या हत्याकांडांनी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सांगलीत 24 तासांमध्ये 3 जणांची हत्या

समोर आलेल्या माहितीनुसार सांगलीत 24 तासांच्या कालावधीत3 खून झाले आहेत. जुन्या वैमनस्यातून, आर्थिक वादातून आणि वैयक्तिक कारणांमुळे हे खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, सलग घडलेल्या या घटनांमुळे पोलिस यंत्रणा खरोखरच सतर्क आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीसांवरील दबाव वाढला असून, तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, पुढील 24 तास निर्णायक ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

किरकोळ कारणामुळे खून

कवलापूर यात्रेमध्ये धक्का लागल्याने एका युवकाचा खून करण्यात आला आहे. कुपवाडमध्ये घरामध्ये घुसून एका युवकाचा खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कुपवाड येथील एका देशी दारूच्या दुकानात एकाचा खून करण्यात आला आहे. लागोपाठ तीन घडलेल्या या घटनेमुळे सांगलीत चिंतेचे वातावरण आहे. सांगलीतील या 3 खून प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, येत्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामान्य माणूस असुरक्षित

किरकोळ कारणांमुळे झालेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या खून होत असतील तर सामान्य माणूस सुरक्षित कुठे? असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला असला, तरी नागरिकांचा रोष कमी होताना दिसत नाही. या घटनांची चौकशी करताना तपास यंत्रणांचा मात्र कस लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.