Koregaon Bribery Case: सव्वा लाखाची लाच घेताना काेरेगावचा पुरवठा निरीक्षक ACB च्या जाळ्यात; महसूल विभागात खळबळ, दाेन आराेपी ताब्यात!
esakal April 07, 2026 11:45 AM

कोरेगाव : येथील गॅस एजन्सीच्या गोदामाची वारंवार तपासणी न करण्यासाठी व एजन्सीविरुद्ध आलेल्या तक्रारीची चौकशी न करण्यासाठी कोरेगाव तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे याच्या सांगण्यावरून खासगी इसम अवधूत दिलीप कालेकर यास आज सव्वा लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार; राज्य शासनाची सुधारित आखणीला मंजुरी, नेमका कसा असेल मार्ग..

याबाबत माहिती अशी, की या प्रकरणातील तक्रारदारांची कोरेगाव येथे भारत गॅस एजन्सी आहे. सध्याच्या युद्धजन्य स्थितीतही ते शासकीय नियमानुसार सिलिंडरचे वितरण करत असताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे (हल्ली रा. एकंबे रोड, कोरेगाव, मूळ रा. पवरानगर, ता. चोपडा, जि. जळगाव) यांनी तक्रारदारांच्या गॅस एजन्सीच्या गोदामाची वारंवार तपासणी न करण्यासाठी व तक्रारदारांच्या गॅस एजन्सीविरुद्ध आलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानंतर तक्रारदारांनी कारवाईच्या भीतीपोटी ३१ मार्च रोजी २५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर उरलेल्या लाचेच्या रकमेची मागणी आनंद शिंदे करत असल्याची तक्रार तक्रारदारांनी एक एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. त्यात आनंद शिंदे हे गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती सव्वा लाख रुपये लाचेची मागणी करत असल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले.

यानुसार सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज केलेल्या कारवाईवेळी आनंद शिंदे याच्या सांगण्यावरून खासगी इसम अवधूत दिलीप कालेकर (व्यवसाय : कृपासिंधू भारत गॅस एजन्सी, कुमठे, रा. बुरूड गल्ली, कोरेगाव) यांनी सव्वा लाख रुपये रक्कम जनसेवा सहकारी बँक, शाखा कोरेगावच्या आवारात पंचासमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या दोघांविरुद्ध कोरेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Pune Airport News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! चार नव्या शहरांसाठी पुण्याहून उड्डाण; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉटना मंजुरी..

ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील व श्रीमती सुप्रिया गावडे, हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, कॉन्स्टेबल विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे, चालक हवालदार महेश पुजारी यांनी केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक श्रीमती गावडे करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.