Tharla Tar Mag Marathi Serial: इस्रायल, इराण आणि अमेरिकेमधील युद्धामुळे गेल्या महिनाभरापासून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. (Iran Isreal USA War)अशा भीतीदायक वातावरणात जगभरातील अनेक कुटुंबं तणावाखाली जगत आहेत. मात्र, या कठीण काळातही एक मराठी मालिका हजारो किलोमीटर दूर असलेल्या इस्रायलमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे, ही बाब खरोखरच भावूक करणारी आहे. 'ठरलं तर मग' या स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिकेने आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत थेट परदेशातही आपली छाप सोडली आहे. (Tharla Tar Mag)
इस्रायलमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने या मालिकेबद्दलचं आपलं प्रेम सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. सततच्या सायरन, हल्ले आणि तणावाच्या छायेत जगताना ‘ठरलं तर मग’ ही मालिका त्यांच्यासाठी दिलासादायक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. अभिनेत्री जुई गडकरीने एक खास अनुभव शेअर करत याविषयी सांगितलं.
स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेची लोकप्रियता आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही मालिका भारताबाहेरही तितक्याच उत्साहाने पाहिली जाते, याचं एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतंच समोर आलं.
डॅनियल कुटुंबाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, “आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र बसून ही मालिका पाहतो. या मालिकेमुळे आम्हाला काही क्षण का होईना, पण तणाव विसरायला मदत होते.” त्यांनी मालिकेतील अर्जुन आणि सायली या जोडीसह इतर कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक केलं.
View this post on Instagram
दरम्यान, सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी हिने हा व्हिडिओ शेअर करत भावूक प्रतिक्रिया दिली. “गेले काही दिवस ठरलं तर मगची संपूर्ण टीम खूप मेहनत करतेय. ४५ मिनीटांचे एपिसोड रोज सुरु आहेत. काहीही झालं तरी ध्येय एकच एपिसोड थांबता कामा नये. अशातच जगाच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या आणि मराठी भाषिकही नसलेल्या इस्त्रायली प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते तेव्हा मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. आपण आपल्या मालिकेच्या माध्यामातून अशा परिस्थितीत अडकलेल्या एका कुटुंबाला आनंद देऊ शकलो याचा मला खूप जास्त आनंद आहे. देव करो आणि ते सगळे कायम सुखरुप राहो अशी भावना जुईने व्यक्त केली.
मराठी मनोरंजन विश्वासाठी ही खरोखरच अभिमानाची बाब आहे की, एका स्थानिक मालिकेने भाषा, देश आणि परिस्थितीच्या सीमा ओलांडत थेट इस्रायलमध्येही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे.