राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्यात पडणार पाऊस? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड, गुवाहाटीचे हवामान आणि खेळपट्टीचा अंदाज
Marathi April 07, 2026 04:24 PM

आयपीएल २०२६ मध्ये आज (मंगळवार, ७ एप्रिल) फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यामध्ये विजय मिळवत फॉर्ममध्ये परतण्याचा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा प्रयत्न असणार आहे.

हार्दिक मागील सामन्यात खराब तब्येतीमुळे खेळला नव्हता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या त्या सामन्यात मुंबईचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते. तो सामना मुंबईने ६ विकेट्सने गमावला होता. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाला एका अष्टपैलूची उणीव जाणवली आणि त्याचबरोबर संघाला त्यांच्या रणनीतीमध्ये बदल करावा लागला. त्याचा अधिक परिणाम गोलंदाजीमध्ये दिसला.

मुंबई आयपीएल २०२६ मध्ये दोन सामने खेळले असून एक सामना जिंकला आणि एक गमावला आहे. दुसरीकडे राजस्थानने खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यांनी सर्व विभागांमध्ये उत्तम कामगिरी केली असून मुंबईची गोलंदाजी निराशाजनक ठरली आहे.

गुवाहाटीची खेळपट्टी – या हंगामात गुवाहाटीच्या खेळपट्टीने वेगवान गोलंदाजांना चांगली सुरूवात दिली आहे. आतापर्यंत येथे एकच सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज १२७ धावसंख्येवरच सर्वबाद झाला होता आणि तो सामना राजस्थानने सहज जिंकला होता. दुपारनंतर पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. राजस्थान विरुद्ध मुंबई सामना संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. रात्रीचा सामना असल्याने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला दवाची अडचण जाणवेल. येथे पॉवरप्लेमध्ये नवीन चेंडूला स्विंग आणि सीम मिळण्याची शक्यता आहे.

गुवाहाटीचे वातावरण – ढगाळ वातावरणामुळे दुपारी पावसाची शक्यता. रात्रीही पावसाची शक्यता असून तापमान २९ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल. सामन्याच्या वेळी १० टक्के पावसाची शक्यता.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० आयपीएलचे सामने खेळले गेले. त्यामध्ये राजस्थानने १४ आणि मुंबईने १६ सामने जिंकले आहेत. मागील पाच सामन्यांमध्ये तीन सामने मुंबईने तर राजस्थानने २०२४ च्या हंगामातील दोन्ही सामने जिंकून पाच वेळेच्या विजेत्याला धक्का दिला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.