Bhim Vakani Paaes Away: दीर्घकाळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’( Tarak Mehta ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेतील दयाबेन साकारणाऱ्या अभिनेत्रीबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री दिशा वकानीचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी (Bhim Vakani)यांचे निधन झाले आहे. दिशाने या मालिकेत ‘दयाबेन’ची भूमिका साकारून घराघरात लोकप्रियता मिळवली. तिचे वडील भीम वकानी हेही नामांकित रंगभूमी कलाकार होते. त्यांनी चित्रपटसृष्टीतही महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र सोशल मीडियावर अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत .
अभिनेते भीम वकानी यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा मयूर वकानी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत मयूर वकानी ‘सुंदरलाल’ची भूमिका साकारतो. मयूरने सांगितलं की, आज सकाळी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, कुटुंबीय आणि जवळचे मित्र त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. या कठीण काळात वकानी कुटुंबाने सर्वांकडून गोपनीयतेची विनंती केली आहे.
भीम वकानी यांचा अभिनय प्रवास खूप समृद्ध आणि विविधतेने भरलेला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगभूमीपासून केली आणि अनेक वर्षे तिथे काम करत आपली कला विकसित केली. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही पाऊल टाकलं. ‘लगान’, ‘स्वदेश’ आणि ‘लज्जा’सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. जरी त्यांच्या भूमिका लहान असल्या तरी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या एका भागात त्यांनी आपल्या मुलीसोबत स्क्रीनही शेअर केली होती. त्या भागात त्यांनी ‘मावजी छेड़ा’ ही भूमिका साकारली होती.
भीम वकानी यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिशा वकानीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, आई झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून ती अभिनयापासून दूर आहे. ‘दयाबेन’च्या भूमिकेमुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तिच्या पुनरागमनाची चाहत्यांसोबतच मालिकेच्या निर्मात्यांनाही प्रतीक्षा आहे. वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अनेक चाहत्यांनी तिला पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, ती परत येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या मात्र वकानी कुटुंब या कठीण प्रसंगातून जात आहे.