नाशिक : महिला लैंगिक अत्याचारातील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीची पाहिली पत्रकार परिषद आज पोलीस (Police) अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी घेतली. अशोक खरातला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली होती, 18 मार्च ला कोर्टात हजर करण्यात आले होते, त्यानंतर पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधीच तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत आजपर्यंतच्या तपासाबाबत माहिती दिली. अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल करुन, महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यातील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे आहेत. त्यापैकी 8 गुन्हे लैगिक शोषणाचे तर 2 गुन्हे फसवणुकीचे आहेत. याव्यतिरिक्त शिर्डी आणि रहाता या दोन ठिकाणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्हे फसवणुकीचे आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली. या दोन्ही गुन्ह्याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत, राहता येथील गुन्हा देखील शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय, असेही सातपुते यांनी सांगितले.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसात अशोक खरातने राजेंद्र जासूद आणि दिनेश परब याच्या विरोधात 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, तर शिर्डी पोलिसांत अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्याविरोधात एका महिलेने बनावट व्हिडीओ व्हायरल करायची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, या दोन गुन्ह्यामुळे अशोक खरातचे बिंग फुटले आणि हळूहळू करवाईचा फास अवळण्यास सुरवात झाली, याच दोन गुन्ह्यानंतर राज्य सरकारने SIT ची स्थापना केली, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
अशोक खरात प्रकरणी 20 मार्चपासून एसआयटीने तपास सुरू केला आहे, नाशिकमधील तो गुन्हा आणि त्याशिवाय ते 10 असे एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत. सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून दोन पोलीस उपाधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने सहाय्यक तपास अधिकारी म्हणून तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 लोकांचं आपलं पथक तपासासाठी कार्यरत आहे. त्यापैकी, काही लोक इतर उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकले नाहीत. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
आजपर्यंतच्या तपासा दरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडं आपण विचारपूस केलेली आहे, साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता. खडे,चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधि इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता, त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीने ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही अशोक खरात करत होता, अशी माहिती सातपुते यांनी दिली.