वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. आजची रात्र ही इराणसाठी काळरात्र असून इराणच्या संस्कृतीचे नामोनिशाण मिटवू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आता पश्चिम आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाला धाकधूक लागल्याचं चित्र आहे.
असं काही घडावं हे मला वाटत नाही, पण आज तसं होण्याची शक्यता आहे, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शेवटचा प्रहार करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच इराणमध्ये संपूर्ण सत्ताबदल होणार असल्याचे संकेतही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आजची रात्र ही इराणसाठी काळरात्र ठरू शकते, इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. आजचा क्षण हा इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण असेल असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.
आजच्या रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, जी पुन्हा कधीही परत येणार नाही. मला तसं व्हावं असं वाटत नाही, पण कदाचित तसं होईल. मात्र, आता संपूर्ण सत्ताबदल झाला आणि बुद्धिमान, कमी कट्टर विचारांचे लोक सत्तेत आले तर कदाचित काहीतरी क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकतं. कोण जाणे? आपण आज रात्री हे पाहू. जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असेल. 47 वर्षांची भ्रष्टाचारी, खंडणीखोर आणि मृत्यूची राजवट अखेर संपेल. इराणच्या महान जनतेवर देवाची कृपा असो!
या वक्तव्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच पश्चिम आशियात तणावपूर्ण परिस्थिती असताना ट्रम्प यांच्या या पोस्टने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढवली आहे. तज्ञांच्या मते, 'सत्तांतर' सारखा शब्दप्रयोग हा अत्यंत संवेदनशील असून, यामुळे राजनैतिक आणि लष्करी हालचालींना वेग येऊ शकतो.