पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच थांबा! इराणमधील भारतीयांना निर्देश, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताचे पाऊल
एबीपी माझा ब्युरो April 07, 2026 11:13 PM

Iran Us Conflicts : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर पश्चिम आशियामधील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. 'पुढचे 48 तास जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा', असे निर्देश भारत सरकारने इराणमधील भारतीयांना दिले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी न उघडल्यास मोठ्या हल्ल्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

इराणसाठी आजची रात्र ही काळरात्र ठरू शकते, इराणचे नामोनिशाण मिटवू अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यानंतर इराण आणि अमेरिकेमधील तणाव अधिकच वाढला आहे. परिणामी जगावर युद्धाचं संकट पसरल्याचं चित्र आहे. 

India Advisory Iran : भारतीयांना निर्देश

भारतीय दूतावासाने स्पष्ट निर्देश देत म्हटले आहे की, पुढील 48 तास जिथे आहात तिथेच थांबा. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच वीज प्रकल्प, लष्करी ठिकाणे आणि उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहावे, असंही सांगण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणतीही अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Safety Advisory To Indians : नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन

अ‍ॅडव्हायजरीमध्ये दूतावासाने विशेषतः हॉटेलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. दूतावासाने बुक केलेल्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तिथेच थांबावे आणि दूतावासाच्या टीमशी सतत संपर्कात राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता, सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

India Emergency Contacts : दूतावासाने जारी केले हेल्पलाईन नंबर

भारतीय दूतावासाने आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडीही जाहीर केले आहेत. +989128109115, +989128109102, +989128109109, +989932179359 हे मोबाइल नंबर आणि cons.tehran@mea.gov.in  हा ईमेल नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. गरज भासल्यास या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Middle East Tension : ट्रम्प यांच्या इशाऱ्यामुळे वाढली चिंता

डोनाल्ड ट्र्म्प यांनी इराणला दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावरून अमेरिका-इराण संबंध अधिकच ताणले गेले असून याचा थेट परिणाम तेथील परदेशी नागरिकांवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.