Crude oil price drop: अमेरिका-इराण युद्धबंदीच्या घोषणेनंतर तेलाचे भाव धडाम् ! पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी ?
GH News April 08, 2026 10:10 AM

Crude oil price drop : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात गोंधळ निर्माण झाला होता. युद्ध, अशांतता, होमुर्जची सामुद्रधुनी बंद, या व अशा अनेक कारणांमुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत होत्या. मात्र आता अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविराम कराराची घोषणा झाली असून त्यामुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतर, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असून त्यांचे दर 15 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले. तर तणावानंतर, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांच्या करारानंतर, 8 एप्रिल रोजी ब्रेंट क्रूड तेलाची किंमत सुमारे 15.19% ने घसरून प्रति बॅरल 92.67 डॉलर इतकी झाली, तर डब्ल्यूटीआय क्रूड तेलाची किंमतही 15.02% ने घसरून प्रति बॅरल 96.03 डॉलर झाली. मात्र, नंतर त्यात किंचित वाढ झाल्याचेही दिसून आलं. .

पुन्हा उघडणार होमुर्जची सामुद्रधुनी

तेलाच्या किंमतीत झालेल्या या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz ) पुन्हा उघडण्याचा झालेला निर्णय. हा जलमार्ग जगातील सुमारे 20% तेल आणि एलएनजी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इराणने ही सामुद्रधुनी तात्पुरती पुन्हा उघडण्यास सहमती दर्शवल्यामुळे, तेलाचा पुरवठा पूर्ववत होण्याची आशा निर्माण झाली आहे.

काय झालं एकमत ?

काल ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करत बेचिराख करण्याची धमकी दिली होती, रात्री 8 वाजता सर्व काही उद्ध्वस्त होईल असा इशारा त्यांनी दिला. मात्र त्यांची डेडलाईन संपण्याआधी काही मिनिटंच दोन्ही देशात युद्धबंदीची घोषणा झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान करत इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबवणार असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, काही तांत्रिक मर्यादांचे पालन केले जाईल, तरीही जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीची खात्री दिली जाईल. या शस्त्रसंधी करारात मध्यस्थी करून पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली. वृत्तानुसार, या करारामुळे लेबनॉनमधील इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील सध्याच्या तणावावरही परिणाम होऊ शकतो.

ऊर्जा बाजारात पुन्हा येणार स्थिरता ?

अमेरिका-इराण तणावामुळे फेब्रुवारीच्या अखेरीपासून तेल बाजारात मोठी अस्थिरता दिसत होती. होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याच्या शक्यतेमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आणि किमतीही वायूवेगाने वाढल्या. एप्रिलमध्ये दररोज सुमारे 9 दशलक्ष बॅरल तेल उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्या आला होता. मात्र आता युद्धविराम आणि तेल पुरवठा पुन्हा सुरू होण्याच्या आशेमुळे तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठांना आणि तेल आयात करणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळू शकतो. जर येत्या काही दिवसांत हा करार कायम राहिला, तर ऊर्जा बाजारात पुन्हा स्थिरता येऊ शकते. या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.