इराणच्या ताकदीच्या अंदाज अमेरिकेला आलाच नाही, इराणच्या 31 प्रांतांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व प्रकारची मोकळीक; बलाढ्य अमेरिकेविरोधात इराणने निकराची लढत कशी दिली?
रजत वशिष्ठ, एबीपी माझा April 08, 2026 12:13 PM

Iran War Live Update: कधीतरी अमेरिका आपल्यावर हल्ला करेल या शक्यतेला गृहीत धरूनच इराणने अनेक दशकं तयारी केली. आणि त्या तयारीचेच परिणाम 40 दिवसाच्या युद्धात दिसून आल्याचे मत संरक्षण तज्ञ आणि सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केले. इराण आपल्या 31 प्रांतांना युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व प्रकारची मोकळीक दिली होती. प्रत्येक प्रांतात ठराविक प्रमाणात सैन्य आणि शस्त्रांचा साठा वाटून दिला होता. प्रत्येक प्रांताला त्यांच्या क्षेत्रात तैनात सैन्याचा आणि शस्त्रांचा वापर करण्याची मोकळीक दिली होती, असे त्यांनी सांगितले. 

शत्रूच्या शक्तीचा अंदाज घ्यावा लागतो

अनिल बाम म्हणाले, युद्धजन्य परिस्थिती संदर्भात निर्णय घेण्याची मोकळीकही इराणच्या केंद्रीय नेतृत्वाने सर्व प्रांतांना दिली होती. एका प्रकारे इराणने त्यांच्या संघराज्य पद्धतीला युद्धजन्य परिस्थितीसाठी बगल देऊन वेगळं स्वरूप दिलं होतं असंही अनिल बाम म्हणाले. दरम्यान, इराणची शक्ती आणि तयारी किती आहे याचा अंदाज घेण्यामध्ये फक्त डोनाल्ड ट्रम्प नाही तर अमेरिकेचे सैन्य अधिकारीही अपयशी ठरले. युद्धात उतरण्यापूर्वीच युद्धातून आपल्याला काय मिळवायचे आहे हे ठरवावे लागते. त्यासाठी शत्रूच्या शक्तीचा अंदाज घ्यावा लागतो, मात्र त्यात अमेरिकी जनरल सपशेल अपयशी ठरल्याचे अनिल बाम म्हणाले. इस्त्रायलला युद्ध कितीही दिवस चालले तरी नुकसान नव्हते. कारण, प्रत्येक दिवसागणिक वाढत जाणाऱ्या युद्धामुळे इराण कमकुवत होत जाईल असं इस्त्रायलला अंदाज होता. मात्र, अमेरिकेला वाढत जाणारा युद्ध परवडणारा नव्हता.. म्हणून अमेरिका शस्त्र संधीच्या मार्गावर पुढे गेला असंही अनिल बाम म्हणाले.

राजकीय आणि मुत्सद्दीदृष्ट्या हा 100 टक्के इराणचा विजय

अनिल बाम म्हणाले की, हे युद्ध 10 ते 15 दिवसांत संपेल आणि इराण शरण येईल, असा अमेरिकेचा अंदाज होता. मात्र, राजकीय आणि मुत्सद्दीदृष्ट्या हा 100 टक्के इराणचा विजय मानला जात आहे, कारण त्यांनी मागील 50 वर्षांच्या तयारीच्या जोरावर अमेरिकेला कडवी झुंज दिली. भारताने या युद्धात 'वेट अँड वॉच' (Wait and Watch) अशी कूटनीतिक भूमिका घेतल्यामुळे मध्यस्थीसाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला. या युद्धबंदीत आणि चर्चेत पाकिस्तानने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्यासोबत इजिप्त आणि तुर्कीनेही मदत केली आहे. दोन्ही देशांसाठी 'एस्केप रूट' (Escape Route): हे युद्ध अमेरिका आणि इराण या दोघांनाही पेलवणारे नव्हते. दोघांनाही यातून बाहेर पडायची इच्छा होती, त्यामुळे ही 15 दिवसांची युद्धबंदी दोन्ही देशांसाठी यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग (Escape Route) ठरला असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.