Beed News: वणवण थांबली; कृत्रिम पाणवठे ठरले मुक्या प्राण्यांसाठी संजीवनी; रणरणत्या उन्हात पाझर
esakal April 08, 2026 01:45 PM

शिरूर कासार: शिरूर कासार रणरणते ऊन अंगाची लाहीलाही करत असताना, माणसांप्रमाणेच जंगलातील मुक्या जिवांचीही पाण्यासाठी कासावीस होते. नैसर्गिक ओढे, तलाव आणि जलस्रोत कोरडे पडल्याने पाखरांचे थवे आणि वन्यप्राणी गावकुसाकडे धाव घेऊ लागले होते.

मात्र, शिरूर कासार तालुक्यातील वन विभागाने निसर्गधर्माचे पालन करत जंगलातच पाण्याची सोय केली आहे. दुर्गम डोंगरदऱ्यात वन विभागाचे टँकर पोहोचू लागल्याने, पाण्यासाठी होणारी वन्यजीवांची जीवघेणी भटकंती आता थांबली असून, सुमारे पाच हजार वन्यजीवांना या कृत्रिम पाणवठ्यांनी मोठा आधार दिला आहे.

Latest Marathi News Live Update: राहुल गांधी यांनी मोहसिना किडवई यांना वाहिली श्रंद्धाजली

तालुक्यातील दहिवंडी, वडळी, मदमापुरी, झापेवाडी, राक्षसभुवन, तांबा, आर्वी, विघनवाडी, तागडगाव, गारमाथा, हाटकरवाडी आणि बरगवाडी या वनक्षेत्रांमध्ये कृत्रिम पाणवठ्यांचे जाळे विणण्यात आले आहे.

एकेकाळी पाण्यासाठी मानवी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांचा अपघातात मृत्यू व्हायचा किंवा उष्माघाताचा फटका बसायचा. मात्र, आता या भागात नियमितपणे टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. यामुळे ससे, हरीण, रानडुक्कर, तरस, बिबट, लांडगे, घोकड, काळवीट, हारण, टिंकरा आणि डौलदार मोर यांसारख्या प्राण्यांना व पक्ष्यांना त्यांच्या अधिवासातच पाणी उपलब्ध होत आहे. वन विभागाचे कर्मचारी दुर्गम भागात रस्ते नसतानाही जिद्दीने पाणी पोचवत असल्याने वन्यजीव संरक्षणाचा हा शिरूर कासार पॅटर्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Air India Fare Hike: इंधन संकटामुळे एअर इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अधिक परिणाम जैवविविधतेचे रक्षण अन् अपघातांना आळा

नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात शेतजमिनी व रस्त्यांवर येतात. यामुळे पिकांचे नुकसान होतेच, पण वाहनांच्या धडकेत वन्यजीवांना प्राणही गमवावे लागतात. वन विभागाच्या या नियोजित उपक्रमामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टळला असून, जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यास मोठी मदत झाली आहे. काही ठिकाणी पाणवठ्यांची दुरुस्ती करून प्लॅस्टिक लाइनिंग करण्यात आल्याने पाणीसाठा अधिक काळ टिकून राहत आहे.

"उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नियमित टँकरद्वारे पाणी सोडले जात आहे. यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे."

- अजय देवगुडे (वनपाल, शिरूर कासार)

"वन विभागाकडून पाणी उपलब्ध झाल्यामुळे वन्यजीवांची भटकंती थांबून रस्ते अपघात कमी झाले आहेत. उष्माघातामुळे होणारे मृत्यू रोखण्यात मोठे यश आले आहे."

- सिद्धार्थ सोनवणे (प्राणीमित्र, तागडगाव)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.