IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११
esakal April 08, 2026 01:45 PM

DC vs MI Marathi News: दोन सामन्यांत दोन विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमधील आपली वाटचाल सुरू करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे पारडे आज (८ एप्रिल) होणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्ध जड आहे, परंतु सलामीवीर आणि अनुभवी के. एल. राहुलच्या फॉर्मची त्यांना प्रतीक्षा आहे.

या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी योग्य सुरुवात झाली आहे. २२ वर्षीय समीर रिझवीच्या निर्णायक योगदानामुळे त्यांनी लखनौ आणि नंतर मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे.

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीचे सर्व फासे अपेक्षेप्रमाणे पडले असले तरी राहुलचे मोठे अपयश चिंता करणारे आहे. लखनौविरुद्ध ० तर मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ एक धाव करणाऱ्या राहुल आज तरी अपेक्षा पूर्ण करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. राहुलसह तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा नितीश राणाही दोन्ही सामन्यांत हजेरी लावून परतला होता. यात दुसऱ्या सामन्यात त्याची चूक नव्हती. जसप्रीत बुमराने यष्टींचा अचूक वेध घेऊन राणाला धावचीत केले होते.

यामध्ये श्रीलंकन पाथून निसांकाने मात्र पहिल्या सामन्यातील अपयशाची भरपाई केली आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात ४४ धावा फटकावल्या होत्या. उद्या मात्र त्याला गुजरातच्या कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांचा पॉवरप्लेमध्ये सामना करायचा आहे. राहुल आणि नितीश राणा यांचा अपवाद वगळता दिल्लीचा संघ एकूणच परिपूर्ण कामगिरी करत असल्याचे दिसून आले आहे. गोलंदाजीत मुकेश कुमार आणि लुंगी एन्गिडी पॉवरप्लेमध्ये विकेट मिळवून देत आहेत, तर टी. नटराजन प्रभावीपणे हळुवार चेंडूंचा वापर करत आहे.

फिरकीची बाजू स्वतः कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सांभाळत आहेत. विपराज निगम हा अष्टपैलू फिरकी गोलंदाजीत प्रभाव पाडत आहे. त्यामुळे पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत झालेल्या गुजरातसाठी ही लढाई सोपी नसेल. शुभमन गिलचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत गुजरातचा फलंदाज साई सुदर्शनने संकेत दिले आहेत. शुभमन पाठीचे स्नायू दुखावल्यामुळे शनिवारी झालेला राजस्थानविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीचा गुजरात संघाला फटका बसला होता. २११ धावांच्या लक्ष्याचा सामना करताना गुजरातची केवळ सहा धावांनी हार झाली होती. शुभमन गिलचे पहिल्या सामन्यातील अपयश आणि दुसऱ्या सामन्यातील अनुपस्थिती यामुळे गुजरातची सलामी डळमळीत झाली आहे.

पहिल्या विजयासाठी गुजरात प्रयत्नशील

समीर रिझवी हुकमी एक्का दिल्ली संघातून खेळणाऱ्या समीर रिझवीने कमालीची फलंदाजी केली आहे. त्याच्या टोलेबाजीत सफाईदारपणा आहे. समोर कोणताही गोलंदाज असला तरी पुढे सरसावत जात चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावण्याची क्षमता तो सिद्ध करत आहे. अगोदर लखनौ आणि नंतर नावाजलेले गोलंदाज असलेल्या मुंबईची गोलंदाजी पूर्णतः निष्प्रभ केली होती. त्याच्या बॅटचा बहर आजही कायम राहिला, तर दिल्लीच्या विजयाची शक्यता वाढणार हे निश्चित.

Vaibhav Suryavanshi Records: १५ वर्षीय वैभवने IPL मध्ये इतिहास घडवला! असा पराक्रम, जो जगात आतापर्यंत कुणालाच नव्हता जमला... संभावित प्लेइंग इलेव्हन (इम्पॅक्ट प्लेअरसह) -

गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार ), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दिल्ली कॅपिटल्स - केएल राहुल (यष्टीरक्षक), पथुम निसांका, नितीश राणा, समीर रिझवी, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.