तबेल्यापासून कबड्डीच्या पंढरीपर्यंतचा अथक प्रवास… खेळाडू, संघटक आणि क्रीडा चाहते या कबड्डी वारकऱ्यांच्या घामाने पावन झालेल्या श्रमिक जिमखान्याच्या हीरक महोत्सवानिमित्त कबड्डीच्या मातीत उमटलेल्या पावलांच्या ठशांना पुन्हा जिवंत करण्यासाठी आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून कबड्डीप्रेमाची आगळीवेगळी चढाई केली जाणार आहे. येत्या शनिवारी 11 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सहा दशके कबड्डीला आपल्या अंगाखांद्यावर खेळविणारा श्रमिक जिमखानाच आपल्या कबड्डी वारकऱ्यांबद्दल कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त करणार आहे.
मुंबईकरांसाठी जसे वानखेडे स्टेडिमय क्रिकेटची पंढरी आहे. तसेच श्रमिक जिमखाना कबड्डीचे तीर्थक्षेत्र बनले आहे. कबड्डीची पंढरी आहे. या पवित्र भूमीवर पहिले अर्जुनवीर सदानंद शेटयेंपासून ते आजच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांपर्यंत सर्व दिग्गजांना एकाच मंचावर आणून सन्मानित केले जाणार आहे. यात मुंबई शहरच्या महिला आणि पुरुष गटातील संघनायक-संघनायिकांचा गौरव या सोहळ्याची शान वाढवणार आहे.
कबड्डीचा वारसा जपणाऱ्या संस्थांनाही मानाचा मुजरा दिला जाणार आहे. आर्य सेवा मंडळ, शिवनेरी सेवा मंडळ आणि अमर क्रीडा मंडळ, दादर यांच्यासारख्या संस्थांनी जपलेली परंपरा आणि त्यांचे योगदान यावेळी उजळून निघणार आहे. तसेच मैदान उभारणारे, रेषा आखणारे अशोक गुरव यांच्यासारख्या पडद्यामागील शिल्पकारांनाही योग्य सन्मान दिला जाणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
चार दशकांहून अधिक काळ खेळणारे विलास जाधव, ‘टायगर’ वसंत सूद, चषक निर्माते हरीश परब तसेच खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे हाडवैद्य, प्रशिक्षक, पत्रकार आणि चाहते या सर्वांचा सन्मान म्हणजे कबड्डी पुटुंबाच्या एकजुटीची जाणीव करून देणारा क्षण असेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी पोहोचवणाऱ्या हिंदमाता सेवा मंडळ आणि मुंबईत पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा आयोजित करणाऱ्या साऊथ पॅनरा क्रीडा मंडळ यांचाही गौरव होणार आहे. हा सोहळा म्हणजे केवळ भूतकाळाचा गौरव नाही, तर पुढील पिढीकडे कबड्डीचा वारसा प्रेमाने आणि अभिमानाने सुपूर्द करण्याचा भावनिक संकल्प आहे. या काwटुंबिक सोहळ्यानिमित्त क्रीडाप्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुनील शिंदे यांनी केले असून, या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याचे निमंत्रण दिले आहे.





