‘अक्षय तृतीया’ हा सण हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण असल्याने याचे विशेष महत्त्व आहे. अक्षय्य म्हणजे जे कधीही संपत नाही, त्यामुळे असे म्हटले जाते की, अक्षय्य तृतीया ही अशी तिथी आहे, ज्यामध्ये होणाऱ्या शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी तुम्ही कोणतेही कार्य केलेत तर त्याचे मिळणारे फळ हे न संपणारे असते. त्यामुळे अनेकजण अक्षय्य तृतीयेला नवीन गोष्टींची सुरूवात आणि खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष प्राधान्य दिले जातात.
सोने का खरेदी केले जाते?
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लग्नासारखी मंगल कार्य केली जातात. विशेष करून या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात पिवळ्या धातूचे सोने सर्वात पवित्र आणि अक्षय्य मानले जाते. यासोबत सोन्याला देवतांचा धातू मानला जातो, त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.
सोनं खरेदी करण्याचे फायदे –
- असं म्हणतात की, अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले सोने कधीही नष्ट होत नाही.
- या दिवशी खरेदी केलेले सोने समृद्धीचे प्रतीक असते, ज्यामुळे ते कमी न होता उलट त्यात वाढ होत जाते.
- धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवी तिच्याकडे असणाऱ्या सोन्याच्या कलशाला जागृत करते. त्यामुळे जो व्यक्ती अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करतो, त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते.
- अक्षय्य तृतीयेचा दिवस वैभव आणि समृद्धी यांना आकर्षित करणारा आहे, त्यामुळे या दिवशी आवर्जून सोन्याची खरेदी करावी.
हेही वाचा – Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीया; वाचा पूजा विधीसह सर्व माहिती एका क्लिकवर






