युद्धाचा बांधकाम व्यवसायावर परिणाम नाही
esakal April 08, 2026 09:45 PM

युद्धाचा बांधकाम व्यवसायावर परिणाम नाही
१८ एप्रिलपासून ठाण्यात भव्य ‘प्रॉपर्टी प्रदर्शन’
ठाणे, ता. ८ : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा ठाण्यातील बांधकाम व्यवसायावर सध्या तरी कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. ठाणे हे गुंतवणुकीसाठी आणि हक्काच्या घरासाठी सुरक्षित केंद्र म्हणून उदयास येत आहे, अशी माहिती ‘क्रेडाई-एमसीएचआय’, ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

येत्या १८ आणि १९ एप्रिल रोजी ठाण्यातील बाळकुम येथील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’ येथे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एमसीएचआय है तो भरोसा है’ या ब्रीदवाक्यासह आयोजित या प्रदर्शनात ग्राहकांना एकाच छताखाली शेकडो गृहप्रकल्प आणि वाणिज्य मालमत्तांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

ठाण्यातील नामांकित विकसकांचे गृहप्रकल्प, गुंतवणुकीच्या संधी आणि आगामी व्यावसायिक प्रकल्पांची सविस्तर माहिती येथे मिळेल. गृहकर्जासाठी विविध नामांकित बँका आणि खासगी वित्तीय संस्थांची दालने प्रदर्शनात असतील, ज्यामुळे ग्राहकांना तत्काळ कर्ज प्रक्रियेची माहिती घेता येईल. ‘महारेरा’कायद्याविषयी माहिती, सरकारी धोरणे आणि गृहसजावटीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाईल. हे प्रदर्शन १८ व १९ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

गुंतवणुकीचे ‘हॉटस्पॉट’
ठाणे शहराचा कायापालट वेगाने होत असून, आगामी मेट्रो प्रकल्प, सुधारित रस्ते आणि पायाभूत सुविधांमुळे हे शहर मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे नागरिकांनी हक्काच्या घरासाठी ठाण्याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले आहे.

आयोजन समिती आणि विश्वासार्हता
गेल्या २२ वर्षांपासून ही संस्था प्रदर्शनांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. या पत्रकार परिषदेला निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैय्याज विराणी, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा आणि युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.