नवी दिल्ली: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अखेर 40 व्या दिवशी दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीमुळं थांबलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबला असला तरी दोन्ही बाजूनं दावे आणि प्रतिदावे समोर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांना टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जे देश इराणला शस्त्र पुरवठा करतील त्यांच्यावर 50 टक्के टॅरिफ लादणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मदत करणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. जे देश इराणला शस्त्रपुरवठा करतील त्यांच्यावर तातडीनं 50 टक्के टॅरिफ लादणार आहे. ट्रम्प यांनी इराणला जो देश शस्त्र पुरवठा करेल त्या देशांमधून अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लादणार असल्याचा इशारा दिला. यामध्ये कोणत्याही देशाला सूट दिली जाणार नाही, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं की अमेरिका आणि इराणसोबत मिळून त्यांचं संवर्धित यूरेनियम खोदून काढण्याचं काम करेल. जे गेल्या वर्षी अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील हल्ल्यात जमिनीत गाडलं गेलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी भूमिका बदलली आणि ते म्हणाले यूरेनियमचं संवर्धन केलं जाणार नाही. आता इराणकडून याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही.
पहिल्यांदा ट्रम्प म्हणाले की अमेरिकेचा इराणसोबत करार झाल्यास जमिनीमध्ये दाबली गेलेली सामग्री बाहेर काढण्यासाठी एक अभियान राबवलं जाईळ. यानंतर ट्रम्प म्हणाले की ते इराणसोबत मिळून टॅरिफ आणि निर्बंधांबाबत चर्चा करत आहोत.
अमेरिका आणि इराण यांच्यातील 39 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध 40 व्या दिवशी शस्त्रसंधीमुळं दोन आठवड्यांसाठी थांबलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जागतिक शांततेसाठी मोठा दिवस असल्याचं म्हटलं. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधी तातडीनं लागू झाल्याचं म्हटलं. आता 10 एप्रिलला पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा होणार आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून 28 फेब्रुवारीला इराण विरोधात लष्करी हल्ले सुरु करण्यात आले होते. अमेरिका आणि इस्त्रायलच्या अपेक्षेपेक्षा युद्ध लांबल्यानं डोनाल्ड ट्रम्प अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या संस्कृतीचा शेवट करण्याचा इशारा देखील दिला होता. मात्र, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी संदर्भात यशस्वी चर्चा झाली. यामुळं सध्या 14 दिवस तरी जगावर असलेलं युद्धाचं सावट कमी झालं आहे.