पुणे : पाटबंधारे विभागाने महापालिकेला १५ टक्के पाणी कपात करण्यासाठी सांगितले आहे. महापालिकेकडून पाण्याची गळती कमी करून पाणी बचत केली जात आहे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करून स्मार्ट मीटरद्वारे पाणी पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू, अनधिकृत नळजोडांच्या विरोधात मोहीम सुरु केली जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण यंदाच्या वर्षी एलनिनो वादळाचा प्रभाव असणार आहे, त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे काही भागात भर पावसाळ्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन खडकवासला धरणातील पाणी ३१ जुलैपर्यंत पुणे शहराला वापरता यावे यासाठी १५ टक्के पाणी कपात करा असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिले आहे.
त्यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘‘पाटबंधारे विभागाच्या पत्राकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही. पाऊस कमी झाला तरी पुणेकरांना व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. पुण्यात सुमारे दीड लाख अनधिकृत नळजोड आहेत. यातून सुमारे २५ टक्के पाणीचोरी किंवा गळती होत आहे. ती रोखण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याच प्रमाण जलवाहिन्यांमधील गळतीही रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
पुणे शहरात एकूण १२७ पाण्याच्या टाक्या आहेत. काही भागात भरपूर पाणी तर काही भागात कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे प्रतिव्यक्ती प्रतिदिन १३५ लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी समान पाणी पुरवठा योजना महत्त्वाची आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात पाणी बचत होईल. तसेच गळती कमी केल्याने १५ टक्के कपात करणेही शक्य होणार आहे. त्यामुळे पाटंबधारे विभागाने पाणी कपात करण्याची सूचना केली असली तरी महापालिका योग्य नियोजन करून पाण्याची बचत करेल, असे आयुक्त राम यांनी सांगितले.
शुक्रवारी बैठक
पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय आवश्यक आहे. त्यादृष्टीने शुक्रवारी (ता. १०) पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.