DC vs GT Live: शुभमन गिलचा पायगुण! फॉर्मात नसलेले खेळाडू पेटले, दिल्लीच्या गोलंदाजांना चोपले; गुजरातने उभा केला धावांचा डोंगर
esakal April 09, 2026 01:45 AM

Delhi Capital vs Gujarat Titans Marathi Cricket Updates: शुभमन गिलच्या येण्याने गुजरात टायटन्सच्या फलंदाजांना सूर गवसला... जॉस बटलर, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह कर्णधार गिलने दमदार फटकेबाजी करून दिल्ली कॅपिटल्ससमोर तगडे लक्ष्य उभे केले. या सामन्यापूर्वी सुंदर व बटलर यांच्या खराब कामगिरीची बरीच चर्चा रंगली होती, परंतु आज या दोघांनी टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर दिले.

सलग दोन विजय मिळवून दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीसमोर आज एकही विजय न मिळवलेल्या गुजरातचे आव्हान आहे. DC कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. GT च्या ताफ्यात कर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन झाले आहे. कुमार कुशाग्रच्या जागी तो परतला आहे. साई सुदर्शनने मागील सामन्यातील फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या षटकात मुकेश कुमारने त्याला ( १२) त्रिफळाचीत केले. पण, त्यानंतर आलेला जॉस बटलर आज वेगळ्याच तयारीने उतरलेला दिसला.

IPL 2026 New Rule: आयपीएलने खेळाडूंसाठी आणला नवा नियम! ज्याचं नाव, त्यालाच परवानगी... नव्या नियमाने फ्रँचायझींमध्ये गोंधळ

त्याने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. मुकेस कुमारने टाकलेल्या पाचव्या षटकात त्याने २३ धावा कुटल्या. त्याआधीच्या षटकात अक्षर पटेलला त्याने दोन खणखणीत षटकार खेचले. या खेळीसह त्याने ट्वेंटी-२०त ६०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. ट्वेंटी-२० त सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांमध्ये ख्रिस गेल ( १०५६), किरॉन पोलार्ड ( ९८२), आंद्रे रसेल ( ७८४) व निकोलस पूरन ( ७१२) हे बटलरच्या ( ६००*) पुढे आहेत.

लुंगी एनगिडीने सहाव्या षटकात केवळ पाच धावा देताना GT ला पॉवर प्लेमध्ये १ बाद ६८ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. बटलरने २३ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. १६ डावानंतर त्याचे ट्वेंटी-२०तील हे पहिले अर्धशतक ठरले. पण, कुलदीप यादवने कमाल केली... त्याने चेंडू आखूड ठेवला आणि बटलरचा त्रिफळा उडाला. त्याने २७ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली आणि गिलसोबत ३२ चेंडूंत ६० धावा जोडल्या होत्या. कुलदीपने चौथ्यांदा बटलरला माघारी पाठवले.

गुजरातचे आज आऊट ऑफ फॉर्म असलेले खेळाडू अचानक फॉर्मात आले. बटलरनंतर वॉशिंग्टन सुंदरने दमदार फटकेबाजी केली आणि गिलसोबत २७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. वॉशिने १२व्या षटकात विपराज निगमला २३ धावा कुटल्या. सेट झालेल्या गिलनेही गिअर बदलला आणि ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १८ व्या षटकात लुंगी एनगिडीने GT च्या कॅप्टनला बाद केले. गिल ४५ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७० धावांवर झेलबाद झाला. सुंदर ३२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांवर बाद झाला आणि गुजरातने ४ बाद २१० धावा केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.