Amravati Minor Girls Assault: अमरावतीत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; दारू पाजून, बदनामी व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप
esakal April 09, 2026 01:45 AM

अमरावती : शहर व ग्रामीण भागातील घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले. एकीला बळजबरीने दारू पाजून अत्याचार केला, तर दुसरीला बदनामीची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.

शहर कोतवाली ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संशयित रोहित बनारसे पवार (वय २६) विरुद्ध अपहरण व अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलीला सायंकाळच्या सुमारास संशयित रोहित पवार याने काठले व मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे म्हणून तिचे पाय पकडले आणि बाहेरगावी चालण्याचा आग्रह धरला. आयुष्यभर सोडणार नाही, अशी बतावणी संशयित रोहितने केली. पीडितेने संशयितावर विश्वास ठेवून दोघेही दुसऱ्या शहरात निघून गेले. निर्धारित ठिकाणी पोहोचल्यानंतर संशयित रोहितने अल्पवयीन मैत्रिणाला दारू पाजून जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला दुसऱ्या ठिकाणी नेऊन पुन्हा दारू पाजून अत्याचार केला. पीडितेने त्याला पुन्हा शहरात परत जाण्याबाबत आग्रह धरला असता संशयित रोहितने तिला मारहाण केली. जबरदस्तीने पीडित अल्पवयीन मुलीला अमरावतीत आणून सोडल्यावर संशयित रोहित पवार हा पळून गेला. पीडितेने घटनेची माहिती नातेवाइकांना दिली. त्यांनी मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी संशयित रोहित बनारसे पवार (वय २६) विरुद्ध अपहरण, अत्याचार व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

वरुड ठाण्याच्या हद्दीतील अन्य दुसऱ्या घटनेमध्ये पीडित अल्पवयीन मुलगी (वय १५) घरासमोर उभी असताना संशयित कन्हैया ऊर्फ आबू गजानन कलाने (वय २०) याने पीडितेला सायंकाळी एका निर्जनस्थळी भेटण्यासाठी बोलविले. न आल्यास आई-वडिलांना सांगून बदनामीची धमकी दिली. त्यामुळे पीडित अल्पवयीन संशयित कन्हैया याला भेटण्याकरीता निर्जनस्थळी गेली. त्याने पीडितेचा हात पकडला, मी तुला पसंत करतो असे म्हणून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने केला. त्या आधारे वरुड पोलिसांनी संशयित कन्हैया ऊर्फ आबू गजानन कलाने विरुद्ध अत्याचार व जीवे मारण्याची धमकीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.