ढिंग टांग : शिव्यांची झाली फुले..!
esakal April 09, 2026 10:45 AM

इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धात पंधरा दिवसांची ‘टाइम प्लीज’ घेऊन अमेरिकेचे ग्रेट राष्ट्राध्यक्ष डोलांडतात्या ट्रम्प यांनी जगावर उपकारच केले. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांना थँक्यू म्हटले पाहिजे. डोलांडतात्यांना युद्धाच्या भरीस घालणाऱ्या इस्राईलच्या बेन्यामिनदादा नेतान्याहू यांनी त्यांना दुजोरा देत आपली क्षेपणास्त्रे म्यान केली, त्याबद्दल त्यांनाही याहू याहू थँक्यू म्हटले पाहिजे. या दोघांच्याही युद्धविरामाला आढेवेढे घेत शेवटी होकार देणाऱ्या इराणला ‘शुक्रान’ म्हणणे टाळता येणार नाही.

या तिन्ही पार्ट्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी धडपड करणाऱ्या पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनाही शुक्रिया मेहेरबानी म्हणण्यावाचून गत्यंतर नाही. एकंदरीत युद्धबंदीनंतर सगळेच एकमेकांवर आभाराची स्फोटके फेकू लागले आहेत. ही बाब अभिनंदनीय मानली पाहिजे.

अनेक पुण्यवंतांमुळे शांततेचे नवे पर्व सुरू झाले आहे. खुद्द प्रधानसेवक नमोजी यांनी तीन दिवसापूर्वी योगसाधना पणाला लावून डोलांडतात्यांच्या मनात परिवर्तन घडवले. कुणी काहीही म्हणो, युद्धविरामाचे श्रेय पाकिस्तान घेत असला तरी खरे श्रेय विश्वगुरूंचेच आहे, हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. (आम्ही त्यापैकीच!) वास्तविक डोलांडतात्यांना बाहेरची बाधा झाली असल्याने त्यांच्यातील पिशाच्चवत विकारांचा विस्फोट झाला होता. परिणामी, त्यांनी अर्वाच्च्य शिवीगाळ केली. पिशाच्च झोंबले की ते शिवीगाळ करते, असा अनुभव आहे. (पहा : चित्रपट ‘द एग्झॉर्सिस्ट’ किंवा ‘पुरानी हवेली’. फॉर दॅट म्याटर ‘धुरंधर’ पाहिला तरी चालेल!!) ‘‘होर्मुझ खोला नाय तर तुमच्या *** पाय **** एकच ***** तेव्हाच थांबीन!’’ असा गाळीव धमकीवजा इशारा डोलांडतात्यांनी दिला. म्हातारं भडकलं की कुणाला आईकत नाही!! असो.

पण नमोजींनी आपली पुण्याई पणाला लावून हळूचकन आपले सिलिंडर काढून घेण्याच्या मिषाने ‘तेलाच्या नव्या आर्डरी देईन म्हणतो’ असे आमिष दाखवले असणार. त्याने युद्धजन्य परिस्थितीचे रूपांतर बाजार परिस्थितीत झाले असणार!! परिणाम? युद्धविराम!!

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या दरम्यान आपले तोंड बंद ठेवून कुणाचेही अपमान केले नाहीत. परिणामी, युद्धाच्या आगीत तेल कमी ओतले गेले. जयशंकर यांना समक्ष भेटून ‘अंतःकरणपूर्वक बं भोले’ म्हणावेच लागेल.

कुठलाही आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग असला की भारताचे सुरक्षा सल्लागार अजय सन्याल (पुन्हा पहा : ‘धुरंधर’) रात्रीअपरात्री कुठे ना कुठे विमानाने जातात. हे गृहस्थ दिवसाढवळ्या कधीच प्रवास करीत नाहीत. रातोरात कुठेतरी जाऊन त्यांनी युद्ध थांबवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनाही थँक्यू म्हणून ठेवणे इष्ट आहे!!

तीनच दिवसांपूर्वी ठाण्याचे कर्मवीर भाईसाहेब शिंदे यांनी युद्ध नको, बुद्ध हवा’ असा जगाला संदेश दिला. साडेतीन वर्षांपूर्वी त्यांनी उठाव केला होता, तेव्हा तेहेतीस देशांचे लक्ष त्यांच्याकडे गेले होते. इराण, अमेरिका आणि इस्राईल हे तिन्ही देश त्यात समाविष्ट होते. भाईसाहेबांचा संदेश योग्य ठिकाणी पोचला, आणि आपण युद्धविराम करायला हवा, हे तिन्ही देशांना मनोमन पटले. वास्तविक डोलांडतात्या संपूर्ण मानवजातीची सभ्यता नष्ट करणार होते, पण तेवढ्यात भाईसाहेबांचा संदेश मिळाला आणि सभ्यता वाचली. जग वाचले!! लाडका देश योजनेअंतर्गत गरीब देशांना पंधरा-पंधरा लाख बॅरल तेल दरमहा फुकट द्यावे, असा तोडगा त्यांनी सुचवला आहे. जगाच्या कल्याणा, भाईसाहेबांसारख्या विभूती असतात. त्यांना आमचे शतशः नमन आणि मनःपूर्वक आभार!

डोलांडतात्यांनी केलेल्या शिव्यागाळीचा उपयोग झाला. रिकाम्या सिलिंडरांवर बसून उपासपोटी जी काही पुष्पवृष्टी कोट्यवधी भारतीयांनी केली, तीदेखील फळां आली. कधी कधी अश्रूंची फुले होतात, आणि शिव्यांच्या ओव्या होतात. इत्यलम.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.