Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: मुंबईत (Mumbai News) आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम गौरव मोरेनंही (Gaurav More) पाहिलं आणि आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सत्यात उतरवलंय. अगदी झोपडपट्टीतलं ताडपत्रीचं घर ते एका उच्चभ्रू सोसायटीतलं नवं आलिशान महालासारखं घर, गौरव मोरेनं आपल्या टॅलेंटच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलंय. अमिताभ बच्चन यांचा फॅन असलेल्या गौरव मोरेच्या नावासमोर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' (Filterpadyacha Bachchan) हे बिरुद चिकटलं आणि त्या नावानं त्याला ओळखलं जाऊ लागलं. आता त्यानं हेच नाव आपल्या नव्याकोऱ्या आलिशान घराला दिलंय.
गौरवनं नव्या घरासोबतच आणखी एक गूड न्यूज दिलीय. गौरवनं गुपचूप लग्न उरकलं आहे. गौरवनं लग्न केलं असून, त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं अनेकांना सुखद धक्का बसलाय. त्यामुळे सध्या गौरववर डबल शुभेच्छांचा वर्षाव होतोय. गौरवच्या आनंदात अनेक कलाकार सहभागी झाले असून अनेकांच्या त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला शुभेच्छाही दिल्यात. अशातच आता आपल्या महाराष्ट्राचं नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांनीही गौरवच्या नव्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याला शुभेच्छा दिल्यात. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी गौरवला शुभेच्छा दिल्यात.
अभिनेत्री छाया कदम यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "स्वप्न अस्वस्थ करतात. स्वप्न लढायला शिकवतात. स्वप्न जगायला शिकवतात. आणि तिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमिताभ बच्चनजींच्या जुन्या हेअर स्टाइलच्या लहानपणापासून प्रेमात वेडा असलेला गौरव पुढे त्याच्या अशाच स्वप्नांचं एक घर उभं करतो. फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून रोज अंधार आकाशातील तारे पाहणारा गौरव, स्वतःच्या कष्टाने आणि कामावर असलेल्या अपार निष्ठेने एक दिवस स्वतः तारा होऊन जातो..."
View this post on Instagram
"जिद्द - चिकाटी आणि भारावलेपण घेऊन,अमिताभजींच्या प्रेमात 'भूतनाथ' झालेला गौरव, पुढे परिस्थितेच्या सगळ्या 'दिवार' तोडत, सोबत 'शहेनशाह'चा आत्मविश्वास घेऊन, आपल्या कामातून दरवेळी 'शोले' भडकवून, एक दिवस स्वतःच्या पायावर 'डॉन' सारखा उभा राहून, असल्या नसलेल्या सगळ्या शक्यतांना 'वजीर' होऊन चेकमेट करतो. तेव्हा तो सगळ्यांना आपला वाटतो आणि हेच त्याचे आपलेपण गौरवला 'फिल्टरपाड्याचा बच्चन' करतात...", असं म्हणत छाया कमद यांनी अगदी हटके अंदाजात गौरव मोरेवर कौतुकाचा वर्षाव केलाय.
छाया कदम यांनी पुढे लिहिलंय की, "कारण या सगळ्या प्रवासात त्याच्यातला निखळ माणूस जराही हलत नाही. उलट तो अजून रोज नव्याने उजळत जातो. आणि काय कमाल आहे, ज्या झोपडपट्टीच्या मातीत गौरवचं बालपण गेले त्याचं झोपडपट्टीच्या जागेवर आज उंच बिल्डिंग बांधली गेली आहे, आणि त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एका सुंदर घरात गौरवच गृहप्रवेश झाला..."
"गौरव! तुझ्या एका जिद्दीने खूप जणांना स्वप्न पाहायची तू हिंमत दिलीस. अजून खूप मोठा हो. इतका मोठा हो की एक दिवस तुझ्या यशाचा 'जलसा' करायचा आनंद आम्हा सगळ्यांना मिळू दे. तुझ्या पुढील सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा. आणि घरासोबतच आयुष्यात आलेल्या जोडीदाराच्या ही खूप साऱ्या शुभेच्छा. खूप गोड आहे प्रियांका. बाकी, तुझ्यातला ‘नटवरलाल’ असा अभिनय क्षेत्रातले तुझे 'सरकार राज' अबाधित ठेवो. खूप खूप प्रेम. शुभेच्छा. आणि शेवटचे.... "परंपरा - प्रतिष्ठा और अनुशासन... मैं हूँ फिल्टरपाड्याचा बच्चन...", असं म्हणत गौरव मोरेला शुभेच्छा दिल्यात.