Baramati Byelection Unopposed: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आता आमदार रोहित पवारही मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज सकाळीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. तर त्यांनी पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या निवडणुकीत आतापर्यंत 53 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे इतके मोठे उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघार घेणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.
सुनेत्रा पवार यांचा सपकाळ यांना फोन
दरम्यान बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. त्यांनी त्याच्यांशी या विषयावर चर्चा केली. बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सपकाळ याविषयीची चर्चा करण्याची शक्यता आहे. तर थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी बोलताना बारामतीसाठी पक्ष जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका अद्यापही तळ्यातमळ्यात असल्याचे दिसते.
आकाश मोरे शरद पवारांच्या भेटीला
आज उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. अजून चर्चेसाठी बराच वेळ आहे. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने त्याची चर्चा होत आहे. शरद पवार यांनी अजितदादांमुळे या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे अगोदरच जाहीर केले होते. सकाळीच रोहित पवार काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना भेटायला गेले. तर काँग्रेसचे उमेदवार आता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवल्या जात आहे.
आकाश मोरे उमेदवारी मागे घेतील?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. तर काँग्रेसचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पक्ष श्रेष्ठ कडून आलेले आदेश आल्यानंतरच पुढील भूमिका मांडणार आहे, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे अजून पाच तासानंतर या सर्व घडामोडीवर पडदा पडण्याची शक्यता आहे.