Pune News : पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून मोफत जेवण; 'सकाळ सोशल फाउंडेशन' आणि 'गुरुद्वारा गुरुनानक दरबार' यांचा उपक्रम
esakal April 09, 2026 03:45 PM

पुणे - स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि लष्कर भागातील (कॅंप) गुरुद्वारा गुरुनानक दरबार यांच्यातर्फे मोफत जेवण वाटप शुक्रवारपासून (ता. १०) करण्यात येणार आहे. बुधवार पेठ येथील ‘सकाळ’च्या कार्यालयात दुपारी १२ ते १.३० या वेळेत (एकवेळ) जेवण वाटप होईल.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा फटका खानावळींना बसल्याने गरजू विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये म्हणून हा उपक्रम होणार आहे. त्याअंतर्गत सुरुवातीला दररोज सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना जेवण वाटप केले जाणार असून, विद्यार्थ्यांच्या वाढणाऱ्या नोंदणीनुसार जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना जेवण दिले जाणार आहे.

अशी करावी विद्यार्थ्यांनी नोंदणी

८६०५०१७३६६ या व्हाट्स ॲप क्रमांकावर विद्यार्थ्यांना आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि अभ्यासिकेचे किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र पाठवून नावनोंदणी करता येईल.

सुरुवातीला दोनशे जेवणाच्या पाकिटांपासून उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या नोंदणीनुसार दररोज अन्न पाकिटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी.

- चरणजितसिंग सहानी, अध्यक्ष, गुरुद्वारा गुरुनानक दरबार, पुणे कॅम्प

राज्याच्या विविध भागांतील, विशेषतः ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात येतात. सध्या तात्पुरती युद्धबंदी झाली असली, तरी सातत्याने दुष्काळ आणि पूर अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करत तसेच कौटुंबिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही असंख्य अडचणींवर मात करून हे विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना मोफत जेवण मिळावे, यासाठी अनेक संस्थांनी पुढे येऊन मदत करणे आवश्यक आहे.

- महेंद्र पिसाळ, विश्वस्त, सकाळ सोशल फाउंडेशन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.