मराठी मुलीनं महिनाभर ‘रोजे’ ठेवले अन् कुटुंबीय हादरले, नाशिकमधील बड्या कंपनीत बळजबरी धर्मांतर; नेमकं काय घडलं?
जयदीप मेढे April 09, 2026 02:13 PM

Nashik Crime News: करिअरचं स्वप्न घेऊन कामाला लागलेल्या तरुणींना एका भयंकर षडयंत्राचा सामना करावा लागल्याचा प्रकार नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आला आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर विशिष्ट धर्मसंस्कृती लादण्याचा प्रयत्न झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: असं उघड झालं ‘धर्मांतराचं’ जाळं

या प्रकरणाची उकल शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून झाली. जुलै 2022 पासून कंपनीत काम करणाऱ्या एका ‘मॉडर्न’ तरुणीच्या वागण्यात अचानक बदल झाला. जीन्स-टॉप वापरणारी ही मुलगी अचानक पंजाबी ड्रेस वापरू लागली. जेव्हा तिने महिनाभर ‘रोजे’ ठेवले, तेव्हा तिच्या कुटुंबीयांचा संशय बळावला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, कंपनीत चालणारा अत्याचाराचा आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला.

Nashik Crime News: शोषणाची ‘मोडस ऑपरेंडी’

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीतील विशिष्ट ‘टीम लीडर्स’कडून तरुणींचा पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ केला जात होता. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवले जात असे. दोन विवाहित महिलांसह आठ तरुणींचे लैंगिक शोषण आणि विनयभंग केल्याचे 9 गुन्हे दाखल झाले आहेत. केवळ तरुणीच नव्हे, तर एका तरुणाचेही बळजबरीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Nashik Crime News: 12 अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (SIT) तैनात

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 12 अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांच्या अनुभवी निरीक्षकांचा समावेश आहे. पोलिसांनी आतापर्यंत 7 पैकी 6 संशयितांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Nashik Crime News: ‘मकोका’ लावण्याची मागणी; गोपीचंद पडळकर आक्रमक

या प्रकरणावर राजकीय पडसादही उमटले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील दोषींवर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या कंपनीच्या पुण्यातील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी नमूद केले. "इतर कोणत्याही कंपनीत अशा प्रकारे शोषण होत असल्यास तरुणींनी न घाबरता तक्रार करावी," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Nashik Crime News: तपास पथकातील प्रमुख अधिकारी 

एसीपी संदीप मिटके, निरीक्षक श्रीनिवास देशमुख, विश्वास पाटील, सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे, सुधीर पाटील, कल्पेश दाभाडे यांच्यासह इतर 6 अंमलदार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

आणखी वाचा 

Pune Crime News: पुण्यात महिला प्राचार्याकडून 7 लाखांची खंडणी उकळली; 'रील स्टार' महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.