वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
Tv9 Marathi April 09, 2026 10:45 PM

पैशांसाठी लोक कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नाही. काही लोक फसवणूक करतात, काही लोक चोरी करतात. अशातच आता एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी एका डॉक्टर तरुणीसोबत लग्न केल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. नागेश ढवळे याच पहिलं लग्न झालेलं असतांना त्याने एका डॉक्टर तरुणीसोबत लग्न केलं. तिच्या वडिलांकडून लाखोंचा हुंडा उकळला असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर नागेश ढवळेवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पहिली पत्नी असताना केलं दुसरं लग्न

समोर आलेल्या माहितीनुसार, टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. नागेश ढवळेने पैशांसाठी एका डॉक्टर तरुणीशी लग्न केले. या लग्नात त्याने मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे आधीच एक लग्न झालेले होते. मात्र फक्त पैशांसाठी त्यांने हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे.

9 जणांविरोधात गुन्हा दाखल

पहिल्या लग्नानंतर डॉ. नागेश हा पहिल्या पत्नीला सोबत पुण्याला न नेता नांदेड येथेच ठेवत होता. काही दिवसानंतर तिला पती नागेशची दुसरी बायको असल्याचे समजले, त्यानंतर आपली आणि आपल्या कुटुंबियांची फसवणूक झाल्याचे समजले. यानंतर तिच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर डॉ नागेश ढवळेसह त्याच्या कुटुंबातील नऊ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गमवावी लागली नोकरी

पहिली पत्नी जिवंत असतांना दुसरी पत्नी करणं कायद्याने गुन्हा त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तिचा भंग केल्याने पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी नागेश ढवळे याला सेवेतून निलंबित केले आहे. आपल्यावर बितलेली आपबीती सांगताना पत्नी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ढसाढसा धायमोकलून हुंदके देत रडत होती. आपलं आयुष्य खराब करून डॉ. नागेशला काय मिळालं? केवळ लाखो रुपये उकळण्यासाठी त्याने आपली फसवणूक केली. माझी तर फसवणूक झाली आहे, आता इतर कुणाची फसवणूक होऊ नये, त्यामुळे नागेशला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पत्नीने केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.