Monsoon Rain Formation : 'मॉन्सून'चा पाऊस ढगांत कसा तयार होतो? पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे आता होणार अधिक सोपे
esakal April 10, 2026 12:45 PM

-प्रज्वल रामटेके

पुणे : मॉन्सूनचा पाऊस ढगांमध्ये नेमका कसा तयार होतो, या प्रक्रियेतील अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण रहस्य उलगडण्यात पुण्यातील ‘भारतीय उष्णकटीबंधीय हवामानशास्त्र संस्थे’च्या (आयआयटीएम) शास्त्रज्ञांना यश आले (Monsoon Rain Formation) आहे. ढगांच्या आत उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात चालणाऱ्या बर्फाच्या प्रक्रियेचा शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास केला असून, या नव्या संशोधनामुळे भविष्यात मॉन्सूनच्या पावसाचा अधिक अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे.

‘मंथली वेदर रिव्ह्यू’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘आयआयटीएम’चे शास्त्रज्ञ मुरली कृष्णा यू. व्ही., सुब्रत के. दास, वाय. के. कोलते, एस. एम. देशपांडे आणि जी. पंडितुराई यांनी हे संशोधन केले आहे.

संशोधनाच्या अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी ‘ड्युअल-पोलरायझेशन सी-बँड रडार’ आणि हवामानाच्या जुन्या माहितीचे विश्लेषण केले. वातावरणाच्या वरच्या थरात जिथे तापमान उणे १५ अंश सेल्सिअसच्या आसपास असते, तिथे बर्फाचे स्फटिक झाडाच्या फांद्यांसारखे वेगाने वाढतात.

अतिथंड पाण्याचे थेंब या स्फटिकांवर आदळून गोठतात आणि त्यातून बर्फाचे आणखी नवीन कण तयार होतात. जेव्हा पावसाचा जोर सर्वोच्च पातळीवर असतो, तेव्हा हे जड झालेले बर्फाचे कण वेगाने खाली येतात आणि त्यांच्या वजनामुळे ढगांमधील ‘वितळणारा थर’ गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचला जातो. याच प्रक्रियांमुळे ढगात पाण्याचे मोठे थेंब वेगाने तयार होतात आणि सलग पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढते.

हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे हे नेहमीच एक मोठे आव्हान असते. सध्याच्या हवामान मॉडेल्समध्ये ढगांच्या आत चालणाऱ्या या सूक्ष्म प्रक्रियांची पुरेशी माहिती नसते. मात्र, ‘आयआयटीएम’च्या या नव्या संशोधनामुळे हवामान मॉडेल्स अधिक अद्ययावत करणे शक्य होणार आहे.

संशोधनाचे फायदे....
  • मॉन्सून आणि अचानक येणाऱ्या अतिवृष्टीचा अचूक अंदाज वर्तविणे सोपे होणार

  • हवामानाचा योग्य अंदाज आधीच मिळाल्यास शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे शक्य होणार

  • मुसळधार पावसामुळे येणारे पूर किंवा इतर धोक्यांचा इशारा वेळेत देऊन जीवितहानी आणि वित्तहानी टाळता येणार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.