काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जळगाव जिल्ह्यात या अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला होता. परिणामी अवकाळीच्या भीतीने बाजारात आवक वाढून गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत भाजीपाल्याचे दर सरासरी 15 ते 40 रुपयांनी घसरले आहेत. असे असले तरी तीव्र उन्हामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. गृहिणी गल्लीत येणाऱ्या हातगाड्यांवरूनच भाजीपाला खरेदीला पसंती देत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्या भाजीचे दर किती कमी झाले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंधरवड्यात भावात झालेले बदलमिरची 60 (आधी 10 रुपये किलो), कांदा 15 (आधी 20), बटाटे 20 (25), भेंडी 40 (60), कारले 40 (60), वांगी 40 (60), कोथिंबीर 40 (60), टोमॅटो 20 (30), चवळी शेंगा 60 (80), फुलकोबी 20 (आधी 40 रुपये किलो) असे दर आहेत. नजीकच्या काळात हेच दर काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे गृहिणींना जरी फायदा होत असला तरी शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे.
बीडमध्ये झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीतअंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव शिवारातील शेतकरी खंडू माचवे यांनी आपल्या चाळीस गुंठ्यामध्ये झेंडूच्या फुलाची लागवड केली होती. फुलं देखील चांगली आली आहेत, मात्र मार्केटमध्ये दहा ते वीस रुपये किलोने फुलं विकली जात असल्याने खर्चही निघत नाही. मागणी आणि पुरवठ्यातील असंतुलन आणि सणांनंतर फुलांची कमी झालेल्या मागणी यामुळे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांची मदतीसाठी सरकारला हाकशेतकरी माचवे यांनी आपल्या 40 गुंठ्यामध्ये 70 ते 80 हजार रुपये खर्च केला होता, यातून दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न होण्याची अपेक्षा होती, मात्र मार्केटमध्ये फुलांना भाव नसल्यामुळे केलेला खर्च निघत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.