खारघरमध्ये नालेसफाईला सुरुवात
पावसाळ्यापूर्वी पूरस्थिती टाळण्यासाठी पालिकेचा उपक्रम
खारघर, ता. १० (बातमीदार) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खारघर परिसरात पालिकेकडून नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
खारघर सेक्टर १ ते ३५ परिसरात मोठे नाले आहेत. विशेषतः पावसाळ्यात खारघर डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे हे नाले भरून वाहत असतात. बहुतांश नाले हे वसाहतीच्या मध्यभागी असल्यामुळे नाल्यात गाळ, प्लॅस्टिक कचरा आणि वाढलेल्या झाडाच्या फांद्यामुळे नाले अरुंद झाले आहेत. खारघर सेक्टर २० आणि २१ मधील नाला हे जलवायू विहार बस थांब्यालगत आहे. शिवाय नाल्याच्या कडेला असलेली झाडे आणि सिडकोने उभारलेल्या सिमेंटच्या कठड्यामुळे उन्हाळ्यात विरंगुळासाठी येत असतात. त्यात गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक वर्षांपासून नाल्यात साचलेले गाळ जेसीबी साह्याने काढून नालेसफाईवर विशेष भर दिल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
चौकट
घनकचरा न टाकण्याचे आवाहन
पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाईसाठी विशेष यंत्रसामग्री तसेच मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. काही ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने गाळ उपसा केला जात आहे, काढलेला कचरा त्वरित उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. दरम्यान, नागरिकांनीही नाल्यात कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. प्लॅस्टिक व इतर घनकचऱ्यामुळे नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या अधिक तीव्र होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट :
नालेसफाई सुरू झाल्याने पावसाळ्यातील पूरस्थिती टाळण्यास मदत होईल, शिवाय शहर स्वच्छ ठेवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पावसाळा पूर्वी खारघरमधील सर्व नालेसफाई केली जाणार आहे.
- वैभव विधाते, उपायुक्त पनवेल महापालिका.