Parli Vaijnath Cime : पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाने संपविले जीवन
esakal April 11, 2026 12:45 AM

परळी वैजनाथ - पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून परळी तालुक्यातील नागापूर येथील एका तरूणाने स्वतःच्या शेतात चिंचेच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारच्या सुमारास घडली.

आत्महत्येपूर्वी या तरूणाने शेवटची फेसबुक पोस्ट करत आत्महत्येचे कारण या पोस्टमध्ये नमूद केले आहे. रामेश्वर साहेबराव गव्हाणे (वय-३०) असे या आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून दोन वर्षापूर्वी परळी परिसरातील उखळी (ता.सोनपेठ) येथील नम्रता जाधव हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. लग्नानंतर पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरूवात केली.

यामुळे मोठा शारिरीक व मानसिक त्रास मी सहन करत होतो. या त्रासाला कंटाळूनच मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या फेसबुक पोस्टमध्ये या तरूणाने स्पष्ट केले आहे. आई आणि सुरेखा मला माफ कर. गेल्या दोन वर्षापासून मी जे सहन करतोय त्या वेदना आता असाह्य झाल्या आहेत, असेही फेसबुक पोस्टमध्ये रामेश्वर गव्हणे याने आपले म्हणणे मांडले आहे.

आणि भावाला आईची आणि सुरेखाची काळजी घेण्याची विनंती या पोस्टमध्ये करून मी आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही पण मला होणार्या असाह्य वेदना सहन करून कंटाळून गेलो आहे असे या पोस्टमध्ये आपली वेदना या तरूणाने मांडली आहे. या पोस्टमध्ये त्याने पत्नीला दिवस गेल्याचा उल्लेख करून काही डॉक्टरांची नावे त्यात घेवून हा फसवणूक झाल्याचा प्रकार आहे असे त्यात म्हटले आहे. दरम्यान सायंकाळी या तरूणाचा मृतदेह पोलिसांनी परळी उपजिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला असून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.