मृत्यूनंतरही दुर्दैवाचा फेरा! सासरच्यांसह आई-वडिलांनीही पाठ फिरवली; पतीनं हत्या केलेल्या पूजावर पोलिसांकडून अंत्यसंस्कार
esakal April 11, 2026 01:45 PM

करमाड इथं शिवसमर्थ पेट्रोल पंपावर गुरुवारी भरदिवसा पत्नीची गळा चिरून निघृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला न्यायालयाने शुक्रवारी (ता. दहा) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मृतावर अंत्यसंस्कारासाठी सुरवातीला नातेवाईकांनी नकार दिल्याने अडचण निर्माण झाली होती. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

संशयित आरोपी सत्यम गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव) याने गुरुवारी दुपारी पत्नी पूजाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली होती. पूजा पंपावर कामाला असताना आरोपीने तिथे जाऊन हे कृत्य केले. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर आरोपी कचनेर शिवारात लपला होता, मात्र करमाड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या दोन तासांत त्याला बेड्या ठोकल्या.

हफ्ता न दिल्यानं ट्रक पेटवला, लष्कराचं दीड कोटींचं साहित्य जळून खाक; पोलीस पळून गेले

दरम्यान, शवविच्छेदनानंतर पूजाचा मृतदेह तिचे वडील, आई व भावाच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, अंत्यसंस्काराबाबत अडचणी निर्माण झाल्या. माहेर कडेठाण (ता. पैठण) तसेच सासर चित्तेपिंपळगाव येथेही अंत्यसंस्कारास नकार देण्यात आल्याने पोलिसांच्या मध्यस्थीने स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास बेगमपुरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पूजाचे आई-वडील आणि भावाची उपस्थिती होती.

पतीला पोलिस कोठडी

करमाड शिवारातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा चाकूने गळा चिरून खून केला. सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चितेपिंपळगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच. पन्हाळे यांनी शुक्रवारी (ता. दहा) दिले.

पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, सध्या रा. करमाड) या दीड महिन्यापासून पेट्रोल पंपावर काम करत होत्या. गुरुवारी (ता. नऊ) दुपारी सत्यमने तेथे येऊन तिचा खून केला. तेथून तो पिंपरीराजा मार्गे कचनेरकडे पळाला; पोलिसांनी पाठलाग करून त्याला दोन तासांत ताब्यात घेत अटक केली. प्रकरणात पेट्रोल पंप मालक बबन भाऊसाहेब मुळे (५३, रा. करमाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहायक सरकारी वकील आनंद पाईकराव यांनी युक्तिवाद करताना, आरोपीचा गुन्हा करण्यामागे नेमका हेतू काय होता. आरोपीचे गुन्ह्यात आणखी कोणी साथीदार आहेत का, त्याला गुन्हा करण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडीची विनंती केली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.