उन्हाळ्यात काकडीचे सेवन म्हणजे आरोग्यासाठी वरदान, 'या' 4 पदार्थांसोबत खाल्ल्यास मिळेल दुप्पट फायदा
Tv9 Marathi April 11, 2026 09:45 PM

उन्हाळ्यात शरीर थंड राहावे यासाठी आपण अनेक प्रकारच्या भाज्यांचे व फळांचे आहारात समावेश करत असतो. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे सेवन अधिक प्रमाणात वाढते. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असल्याने वजन कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. तसेच हाडांपासून ते पचन आणि त्वचेपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर असलेली अनेक पोषक तत्वे काकडीमध्ये असतात.

USDA नुसार काकडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, फ्लोराईड, व्हिटॅमिन सी, फोलेट, कोलीन, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए चे बीटा-कॅरोटीन व बीटा-क्रिप्टोक्झॅन्थिन सारखे प्रकार आढळतात. काकडी पोषक तत्वांचा एक समृद्ध स्रोत आहे. म्हणून आपल्यापैकी अनेकांना नाश्त्यात, दुपाऱ्याच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात काकडीचा समावेश करतात. तर उन्हाळ्याच्या हंगामात तुम्ही काकडीचे सेवन या अनेक प्रकारच्या पदार्थांसोबत केल्यास तुम्हाला त्वरित ताजेतवाने वाटेल आणि शरीरातील पौष्टिक मूल्य वाढवू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण काकडी सोबत कोणते पदार्थांचे सेवन करणे फायद्याचे ठरेल ते जाणून घेऊयात.

काकडी आणि दही

काकडी आणि दह्याचे मिश्रण केवळ चविष्टच नाही, तर उन्हाळ्यात आरोग्यदायी सुद्धा आहे. तुम्ही काकडी किसून त्याचा रायता बनवू शकता. किंवा तुम्ही काकडीचे लांब पातळ काप करून त्या दह्यामध्ये मिक्स करून त्यात थोडे काळे मीठ व काळी मिरी पूड टाकून तुमचे उन्हाळ्यातील रिफ्रेशिंग सॅलड तयार आहे.

स्प्राउट्स आणि काकडी

जर तुम्ही नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्य खात असाल तर त्यात काकडीचा समावेश करणे फायद्याचे ठरेल. तर डाएट करणाऱ्यांनी स्प्राउट्सला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये काकडी बारीक चिरून त्यात टाका. त्यासोबत थोडे बारीक चिरलेले टोमॅटो, थोडी हिरवी मिरची, काळी मिरी पूड, लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करा. तुमचे चविष्ट स्प्राउट्स काकडीचे सॅलड तयार आहे.

काकडी आणि लिंबाचे पेय

लिंबू आणि काकडीचे पेय उन्हाळ्यात तुम्हाला केवळ निरोगीच ठेवत नाही, तर ते खूप रिफ्रेशिंग करणारे देखील आहे. ब्लेंडरमध्ये काकडी, लिंबाचा रस आणि थोडे पाणी टाकून मिश्रण तयार करा. आता एका भांड्यात हे मिश्रण गाळून घ्या आणि त्यात बर्फाचे तुकडे टाका. थोडे काळे मीठ टाकून मिक्स करा. चवीला उत्तम असणारे आणि तुम्हाल या कडक उन्हातही रिफ्रेशिंग करणारे पेय तयार होईल, जे तुमच्या शरीरातील विषारी घटक देखील काढून टाकेल. डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी तुम्ही हे दोन्ही घटक रात्रभर पाण्यात भिजवून देखील ठेवू शकता.

काकडी आणि ताकाचे पेय

काकडी आणि ताकाचे पेय हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे. ते तुम्हाला त्वरित ऊर्जा देते आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते. काकडी कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, के आणि मॅग्नेशियमचा स्रोत आहे, तर ताकातून व्हिटॅमिन डी आणि बी12 मिळतात आणि ते एक प्रोबायोटिकसुद्धा आहे. यामुळे त्याचे फायदे आणखी वाढतात. काकडी आणि ताकाचे पेय बनवण्यासाठी ताकामध्ये काकडीचे काप करा त्यातमध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड, पुदिना, काळे मीठ, काळी मिरी आणि हिरवी मिरची टाकून एकत्र वाटून घ्या. तुमचे मसाला काकडी ताक तयार आहे.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.