आयपीएल 2026 स्पर्धेच्या 17व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा आमनासामना झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 219 धावा केल्या. तसेच विजयासाठी 220 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हा न पंजाब किंग्सने 6 गडी राखून पूर्ण केलं. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करण्यात अपयश आलं. खरं तर पावरप्लेमध्येच पंजाब किंग्सने अर्धा सामना जिंकला होता. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत यासह पंजाब किंग्सने स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आहे. कोलकाताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण मिळाला होात. या विजयासह पंजाब किंग्सच्या खात्यात 7 गुण पडले असून गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
आयपीएल स्पर्धेतील 17 व्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकात 99 धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्याने 20 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत 57 धावा केल्या. तर प्रभसिमरन सिंगने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 51 धावा केल्या. तर कूपर कोनोली फक्त 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पंजाबचा विजयाचा मार्ग सोपा होत गेला. श्रेयस अय्यरने 24 चेंडूत अर्धशतक ठोकलं आणि संघाला संकटातून बाहेर काढण्यात मोलाचा हातभार लावला.
अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिड हेड ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने हैदराबादला आक्रमक सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 74 आणि ट्रेव्हिस हेडने 23 चेंडूत 38 धावांची खेळी केली. ही जोडी फुटली आणि धावगतीला ब्रेक बसला. इशान किशन 17 चेंडूत 27 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 39 धावा करताना 33 चेंडूंचा सामना केला. त्यामुळे धावगती वाढवण्यात फार काही मदत झाली नाही. अनिकेत वर्माने 18, सलील अरोराने 9 धावा केल्या. तर नितीश कुमार रेड्डीने नाबाद 0 आणि हरिश दुबेने नाबाद 1 धाव केली.