कळश्या, हंडे, बादल्या आताच भरून ठेवा! दक्षिण मुंबईत दोन दिवस पाणीबाणी, महापालिकेचं आवाहन काय?
Tv9 Marathi April 12, 2026 12:45 PM

दक्षिण मुंबईतील नागरिकांना येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी पाणीपुरवठ्यात मोठी अडचण येणार आहे. मुंबई महानगरपालिके (बीएमसी)ने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी १८ तासांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो 15 तारखेला घरातील पाण्याचा साठा वाढवा. दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणी जपून वापरा. आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये दोन दिवस पाणी येणार नाही? चला जाणून घेऊया…

या पाणी कपातीचा परिणाम A, B, C, E आणि F-South विभागांतील अनेक भागांवर होणार असून, परळ, लालबाग, दादर, भायखळा आणि कुलाबा परिसरातील नागरिकांना काही काळ पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कधी आणि किती वेळ बंद?

बीएमसीच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १७ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत म्हणजे सुमारे १८ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, झडप बदलणे आणि इतर तांत्रिक तपासणीची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.

बीएमसीचे आवाहन

बीएमसी प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, ते आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवावे. पाण्याचा जपून वापर करावा आणि अनावश्यक वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर नियोजित वेळेनुसार पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल.

का घेतला निर्णय?

ही पाणी कपात मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी आवश्यक असल्याचे बीएमसीने सांगितले आहे. नियमित देखभाल कामांमुळे पाणीपुरवठा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि सुरळीत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नागरिकांना सल्ला:

-१५ एप्रिलपर्यंत घरात पुरेसे पाणी साठवून ठेवा

-पाण्याचा मिती वापर करा

-दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल याची नोंद घ्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.