अमेरिका-इराणची इस्लामाबादमधील चर्चा फेल, पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणाले...
जयदीप मेढे April 12, 2026 02:13 PM

US-Iran Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये झालेली 21 तासांची महत्त्वपूर्ण चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता यजमान राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार (Ishaq Dar) यांनी या प्रकरणावर भाष्य करताना, दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) आपले प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ishaq Dar: काय म्हणाले इशाक दार?

इशाक दार यांनी सांगितले की, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील संवाद सुलभ करण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. "सध्या लागू असलेला 'सीजफायर' (युद्धविराम) पुढे वाढवण्यात यावा, जेणेकरून भविष्यातील चर्चेसाठी पोषक वातावरण कायम राहील, ही पाकिस्तानची मुख्य इच्छा आहे," असे दार यांनी नमूद केले. तसेच, दोन्ही देशांनी संयम पाळावा आणि सीजफायरचे उल्लंघन करू नये, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

US-Iran Talks: अमेरिकेच्या 'या' अटींमुळे वाटाघाटींचा पेच

या चर्चेत कोणताही निष्कर्ष न निघण्यामागे अमेरिकेने ठेवलेल्या अत्यंत कडक अटी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने इराणसमोर दोन मुख्य मागण्या ठेवल्या होत्या. 

1. झिरो एनरिचमेंट (Zero Enrichment): इराणने युरेनियमचे संवर्धन पूर्णपणे थांबवावे.
2. साठा देशाबाहेर पाठवणे: इराणकडे असलेला सुमारे 900 पाउंड युरेनियमचा साठा देशाबाहेर हलवण्यात यावा.

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीवर कोणाचे वर्चस्व?

चर्चेतील दुसरा मोठा वादाचा मुद्दा म्हणजे 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz). जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या समुद्री मार्गाच्या सुरक्षेचे पूर्ण नियंत्रण आपल्या हातात राहावे, अशी अट अमेरिकेने घातली होती. या अटींवर इराणने तीव्र आक्षेप घेतल्याने कोणतीही तडजोड होऊ शकली नाही.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार?

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील 40 दिवसांच्या युद्धावर 15 दिवसांचा सीजफायर लागू झाला मात्र, चर्चेत तोडगा न निघाल्याने हा युद्धविराम जास्त काळ टिकणार नाही, अशी भीती जागतिक राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान अद्यापही मध्यस्थाची भूमिका बजावण्यास तयार असला तरी, अमेरिका आणि इराणमधील अविश्वासाची दरी रुंदावल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा 

Iran US War: इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ, अमेरिका-इराण युद्धात आता चीन-रशियाची एन्ट्री होणार? नेमकं काय म्हणाले निवृत्त मेजर जनरल अनिल बाम?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.