Nanded News: माहूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासाठी पैनगंगा 'आंदण'; ट्रेझर बोटींसह जेसीबी व पोकलँड मशीनचा वापर, पर्यावरणाला धोका
esakal April 12, 2026 03:45 PM

-साजिद खान

माहूर : तालुक्यातील सायफळ आणि लांजी पैनगंगा नदी पात्रात वाळू उपसा करण्यासाठी नियोजित ताबा दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून सदरील वाळू घाटाचा लिलाव झालेला असला तरी प्रत्यक्षात नियमबाह्य पद्धतीने उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे.नदी पात्रात सहा ट्रेझर बोटींच्या साहाय्याने वाळू काढली जात असून,यासाठी जेसीबी व पोकलँड मशीनचाही सर्रास वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?

स्थानिक नागरिकांच्या तक्रारी नुसार, महसूल व पर्यावरण विभागाकडून सर्वेक्षण करून वाळू उत्खननासाठी क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहेत त्या क्षेत्रा व्यतिरिक्त वळण भाग आणि पाण्याचा प्रवाह असलेल्या क्षेत्रांमध्ये यांत्रिकी उत्खनन होत असल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाहावर प्रभावित होत आहे.नदी पात्राची खोली वाढत असून किनाऱ्यांची धूप होत आहे. परिणामी,भविष्यात पाणी टंचाईसारखे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तसेच प्रवाहित पाण्यातील जैवविविधता,जलचर प्राणी व पर्यावरणीय संतुलन यांनाही मोठा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे, गौण खनिज नियमानुसार वाळू घाटाचा लिलाव झाल्यानंतरही प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.शासनाने निश्चित केलेल्या अटी व पर्यावरणीय नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

या संपूर्ण प्रकारात प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.किनवट चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,तालुका प्रशासन व तसेच माहूर व वाई बाजार मंडळाचे मंडळ अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावरून या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून सुरू असलेला वाळू उपसा संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले नसेल असे नाही, परंतु मोठ्या आर्थिक तडजोडीतून महसूल विभाग सवयीप्रमाणे पार्टनरशिप जोपासत असल्याने ‘कुंपणच शेत खात आहे’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या नदी पात्रातील अशा प्रकारच्या बेकायदेशीर उत्खननावर वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा इशाराही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.

नियमबाह्य वाळू उपसा; कवठा बाजार दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती

दरम्यान,१३ एप्रिल २०२४ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कवठा बाजार येथे घडलेली भीषण घटना आजही नागरिकांच्या स्मरणात आहे.पैनगंगा नदीपात्रात निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील महिला व त्यांच्या दोन पुतण्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्या होत्या.एका चिमुकलीचा तोल जाऊन ती पाण्यात बुडू लागल्याने तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली,त्यानंतर काकूही मदतीसाठी धावल्या.मात्र,तिघींचाही दुर्दैवी अंत झाला.या दुर्घटनेमागे माहूर तालुक्यातील लांजी,टाकळी परिसरातून अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्रात निर्माण झालेले खोल खड्डे कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते.सततच्या वाळू उपशामुळे नदीत विहिरी सारखी खोल विवरे तयार झाली होती. पाण्याचा प्रवाह त्यात फिरत असल्याने खोलीचा अंदाज येत नव्हता आणि याच कारणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.

MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!

बिलोली तालुक्यात सगरोळी-येसगी वाळू घाटावर विधिमंडळ अंदाज समितीने अचानक भेट देत नियमबाह्य उत्खननावर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर,माहूर तालुक्यातील परिस्थितीकडेही लक्ष वेधले जात आहे. सायफळ सह लांजी घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.त्यामुळे बिलोली प्रमाणेच माहूर तालुक्यातही अंदाज समितीच्या धर्तीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संयुक्त पथक गठित करून कारवाई करण्याची गरज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.