Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार
esakal April 12, 2026 11:45 PM

लोणी काळभोर : पाण्याच्या बॉटलिंग प्लान्टमध्ये भागीदारी देण्याच्या नावाखाली २ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी आनंद मदनलाल लाहोटी (रा. हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन राजेश सत्यनारायण काबरा (वय ५४) व रोहित राजेश काबरा (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये लाहोटी यांना प्रतिक काबरा यांनी “बॉटलिंग व्यवसायात मोठा नफा मिळतो असे सांगितले त्यावर विश्वास ठेवून लाहोटी यांनी ३ लाख रुपये गुंतवून कदमवाकवस्ती येथे को-पॅकेजिंग व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला नफा दिसल्याने आरोपींनी स्वतःचा प्लान्ट उभारण्याचा प्रस्ताव ठेवून जादा नफा मिळेल असे सांगून त्यांना मोठ्या गुंतवणुकीस प्रवृत्त केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये भागीदारी फर्म स्थापन करण्यात आला. त्यामध्ये लाहोटी व प्रतिक काबरा हे समभागीदार होते, तर राजेश व रोहित काबरा यांच्यावर प्लान्ट व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली.

यानंतर प्लान्ट उभारणी,यंत्रसामग्री,परवाने आणि कच्चा माल यासाठी बँक व्यवहार व रोख रक्कम मिळून एकूण गुंतवणूक २ कोटी ३४ लाख २३ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्लान्टमधून दररोज सुमारे ३ हजार बॉक्स उत्पादन होत होते आणि सुमारे ६० लाखांचा व्यवसाय झाला. परंतु फर्मच्या खात्यात फक्त ५.१९ लाख रुपये जमा झाले, उर्वरित रक्कम आरोपींनी स्वतःकडे वळविल्याचे तपासात स्पष्ट झाले.

लाहोटी यांनी हिशोब मागितल्यानंतर टाळाटाळ सुरू झाली. अखेरीस त्यांनी भागीदारी संपवून गुंतवणूक परत मागितली असता “मशिनरी विकून पैसे देतो” असा बहाणा करण्यात आला. परंतु प्लान्टवरील यंत्रसामग्री गायब असल्याचे निदर्शनास आले. मशीनरी ६० लाखांना विकल्याचे सांगण्यात आले, परंतु त्याचा हिशोबही देण्यात आला नाही.

यानंतर लाहोटी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी आणि राजेश काबरा व रोहित काबरा यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर प्रतिक राजेश काबरा हा फरार झाले असून पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.