बेडगच्या मरगाई यात्रेत 'ताटिकेचे सोंग' : ताडकावनाच्या राणीचा स्त्री-राज्यकर्ती, निसर्गरक्षक आणि लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा
esakal April 13, 2026 01:45 AM

'अरे सेनापती, या उत्तर दिशेतून शत्रूप्रवेश झाला तर काय विलाज करशील रे!', सेनापती उत्तर देतो, 'सरकार, या उत्तर देशातून शत्रूप्रवेश होऊन आपणास काही करणार नाही. यासाठी तीरांची कैची, केवळ बाणांचा कोट केला आहे. या ठिकाणी वायूदेखील प्रवेश होणार नाही. त्यामुळे शत्रू काही करणार नाही महाराज !'

ती सेनापतीला दुसरा एक प्रश्न विचारते, 'अरे सेनापती, आपली सेना कोणकोणत्या विद्येत तयार आहे रे?' त्यावर सेनापती उत्तरतो, 'आपली सेना कोणकोणत्या विद्येत तयार आहे, असे विचाराल, तर आपली सेना अस्त्रात तयार आहे. शस्त्रात तयार आहे. वायूचक्रात तयार आहे. अग्निचक्रात तयार आहे. जशी आकाशात विद्युल्लता चमकते, याचप्रमाणे आपली सेना चमकत आहे महाराज !'

हा संवाद कोणत्या पौराणिक, पारंपारिक नाटकातील नव्हे. तर तो आहे, सांगली जिल्ह्यातील मिरजजवळ असलेल्या बेडग या गावातील मरगाई यात्रेत काढल्या जाणाऱ्या ताटिका सोंगातील. ताडाच्या वनाची राणी म्हणून जिची ओळख आहे, ती महाराणी ताटिका (त्राटिका, ताडका) हिच्या राज्यकारभाराची आठवण करून देणारे आणि तिचा गौरव करणारे सोंग असते. तिचा आपल्या सेनापती, प्रधान आदींसोबत झालेला हा संवाद सोंगातून मांडला जातो. हा संवाद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये ताटिकेची प्राचीन ओळख आणि तिचा वारसा अधोरेखित करतो.बेडग गावाने ताटिकेचा हा वारसा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून शेकडो शतकांपासून जपला आहे.

बेडग गावातील प्राचीन देवता मरगाईच्या यात्रेत हे ताटिकेचे सोंग काढले जाते. हे सोंग म्हणजे ताटिकेचा राजकारभार, तिचे सैनिक, घोडदळ, वनातील नाचणारा मोर आदी सर्व चित्र या सोंगातून उभे केले जाते. सोंग पाहताना उपस्थित ताटिकेच्या त्या राज्यातील इतिहासात आपल्याला विसरून जातात, इतके प्रभावी सोंग केले जाते.

पाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवार अथवा शुक्रवारी हा यासाठीचा दिवस निश्चित करून या सोंगासह येथील यात्राही ठरते. मरगाई म्हणजेच महाराष्ट्राच्या प्रत्येक गावांबाहेर, चौरस्त्यावर असलेली ग्रामदेवता मरिआई. तिला काली, महाकाली, धुरपता, मरिअम्मा, रेणुका आदी नावाने ओळखले जाते. शाक्तपंथाची ही मूळ देवता. चैत्राच्या पाडव्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मात्र देवतांच्या विविध ठिकाणी होणाऱ्या यात्रांमधून त्यांचा गौरव करणारे अनेक उत्सव साजरे होतात. विशेषत: शाक्तपंथाचा वारसा असलेल्या शिव आणि शक्ती देवतांचा हा उत्सवाचा काळ असतो. शक्ती देवतांच्या म्हणजेच मातृदेवतांच्या स्थळठिकाणांवर होणाऱ्या यात्रेदरम्यान पशूबळी देऊन तिची पूजा केली जाते.बेडगच्या मरगाईच्या यात्रेतही देवीसमोर मोठ्या प्रमाणात दिला जातो. पूर्वीपेक्षा अलिकडे बळी देण्याची प्रथा कमी झाली असली तरी भक्तगण आपापल्या ठिकाणी कोंबडे, बकऱ्यांसह रेड्याचा बळी देऊन देवीला बोललेला नवस पूर्ण करत असतात.

बेडगमध्ये गावाबाहेर मूळ मरगाईचे मंदिर आहे. धनगर समाजाकडे त्याचे व्यवस्थापन आहे. तर गावात मुख्य मंदिर गावशेजारी मोठ्या वडाजवळील मांग वस्तीतही मरगाईचे मंदिर असून तेही मूळ मंदिर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावातील मरगाईसमोर यात्रेदरम्यान शेकडो पशूबळी दिले जायचे त्यातील रक्ताचा पाट या मांग वस्तीतील मरगाई देवीपर्यंत येत असे. एकदा संत गाडगे महाराजांचे या गावात किर्तन झाले आणि तेव्हापासून मुख्य मंदिरासमोर बळी देण्याची प्रथा बंद झाल्याचे प्राचार्य राजेंद्र नागरगोजे सांगतात.

मरगाई ही ताटिकेचे प्रतिरूप असल्याचे समजून तिची मातृदेवता म्हणून पूजा होते. गावातील माहेरवासिनी मुली तिला साडीचोळी, बांगड्या अर्पूण तिची ओटी भारतात, तिची पूजा करतात. ताटिकेच्या सोंगासाठी माहेरवासिनीकडून आणलेली साडीच वापरली जाते. ताटिकेच्या सोंगासाठी वापरल्या जाणाऱ्या १२ साड्या या याच माहेरवासिनींच्या असतात. ताटिकेचे हे सोंग करण्याची परंपरा पूर्वी सुतार समाजाकडे होती. त्यानंतर मराठा आणि आता येथील वंजारी समाजाकडे आहे. हा समाज ताटिकेचा हा वारसा अत्यंत निष्ठेने आणि पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, संकेतांना बाधा येणार नाही अशा पद्धतीने सांभाळत आहेत.

ताडाच्या वनाची राणी ताटिका हिचे मूळ बिहारमधील बक्सर आदी भागात सांगितले जात असले तरी प्राचीन काळी बेडगशेजारी असलेल्या दंडोबाच्या डोंगराचा हा भाग त्या वनाशी संबंधित असावा. त्यामुळेच त्याचे बीजे येथील भूमित रूजली असल्याने ताटिकेचे सोंग बेडगमध्ये शतकानुशतके सुरू असावे.

मरगाईच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी गावातील धनगर समाज रात्रभर ओव्यांचा कार्यक्रम करतो. त्याच दिवशी मरगुबाई मंदिराला लोटांगण, दंडवत घालण्याचा लोक नवस फेडतात. दरम्यान आंबिलाचा नैवेद्य दाखवून तो मंदिरपरिसरात शिंपण्याचा एक अनोखा कार्यक्रम होतो. त्यावेळी आंबिलाचे फेरे होतात. या आंबिलाचे गावातील मानकरी असतात. यात माळी, वंजारी आदी समाज असतात. यावेळी गावातील सर्वच बहुजन समाज यात सहभागी असतो. विशेष म्हणजे बेडग गावातील सगळ्याच माहेरवाशींनींच्या मंदिरात आंबिल शिपण्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात.

आंबिल शिंपल्यानंतरच ताटिकेच्या सोंगाची तयारी होते. सोंगात सहभागी होणारे सर्व कलावंत, मानकरी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात आणि तिथून सोंगाची सुरुवात होते. सोंग सजवणे, रंगकाम करणे, ज्या लाकडी मरगळीवर सोगांतील कलावंत उभे राहतात, त्या मरगळी बांधण्यासाठीची तयारी केली होते. सोंगात ताटिकेचे आक्राळविक्राळ रूप दाखविण्यासाठी तसा मुखवटा तयार केलेला असतो. लाकडी मरगळीवर उभी राहणाऱ्या त्राटिकेच्या उंचीनुसार मोराचा पिसारा गोलाकारमध्ये बारा लुगड्याची सजावट असते. मागील वर्षी दक्षिणेत आलेल्या कंथारा सिनेमातील पात्राप्रमाणेच ही ताटिकेची सजावट असते. सुमारे ४५ किलो वजनाचा मोरपिसारा आणि इतर सजावट असते. ते वजन घेऊन ताटिकेचे सोंग करणारा कलावंत येथील चार चौकांमध्ये सभा करत हे सांग काढत असतो. ताटिकेचे हे सोंग सध्या परशुराम नागरगोजे करतात. सेनापतीचे काम प्रकाश नागरगोजे करतात. प्रधानासह घोडेस्वार, सैनिक, दिवटी घेऊन चालणाऱ्यांमध्ये गावातील अनेक कलावंत, वाजंत्री, सहभाग असतात.

गावाबाहेरील मरगाई देवीपासून रात्री मशालींच्या उजेडात निघालेले हे सोंग गावातील प्रत्येक चौकात ताटिकेच्या राज्यकारभाराची आठवण करून देण्यासाठी सभा घेते. सभेमध्ये ताटिका आरोळी देत आपल्या सेनापती, प्रधानजी यांना आपल्या राज्यातील नागरीकांपासून ते आपल्या वनाची कोणी नासधूस केली इथपर्यंत प्रश्न विचारते. आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी कोणती तयारी आहे, आपल्यापेक्षा इतर कोणते राज्य वरचढ अथवा श्रेष्ठ आहेत असे अनेक प्रश्न ती उपस्थित करते. शेवटी हे सोंग मरगाई मंदिराजवळ पोहोचते. सभा सुरू असतानाच एक 'मानवाचं कारटं' (सोंगात असलेला उल्लेख)मध्येच येते आणि ताटिका, तिच्या सैन्यासोबत युद्ध करून ताटिकेचे सर्व साम्राज्य उद्धवस्त करते आणि तिथे या सोंगाची समाप्ती होते.

ताटिका आणि तिचा संघर्ष हा रामायणाशी जोडला जात असला तरी त्याचे लोकपरंपेत वेगळे संदर्भ मिळतात. राक्षसी म्हणून तिची प्राचीन साहित्यात नोंद केली जात असली तरी बहुजन समाजातील एक मातृदेवता म्हणून तिची महिला ओटी भरून पूजा करतात. मरिआई, भूमातेप्रमाणेच तिला लोकपरंपरेत आदराचे स्थान आहे. मातृसत्ताक परंपरच्या ऱ्हासाची सुरूवातच ताटिकेच्या नंतर सुरू होऊन देशात पुरूषसत्ताक परंपरा बळकट झाली यामुळे आपोआपच ताडाच्या वनाची राणी ही भूमाता, मरगाई, मरगुबाई म्हणून पुजली गेली असावी. यामुळे बेडग गावातील ताटिकेच्या सोंगाकडे केवळ ती राक्षसी होते म्हणून पाहिल्यास तिचे प्राचीन स्त्री-राज्यकर्ती, निसर्ग रक्षक आणि लोकसंस्कृतीची जननी म्हणून असलेले योगदान नजरेआड होईल. सोंगातील तिचे संवादच तिचे योगदान तिची आपल्या राज्याप्रती, नागरींप्रती असलेली भूमिका, वनाच्या संरक्षणासाठीची भूमिका स्पष्ट करतात. ताटिका ही मूळातच एक कुशल संघटक आणि प्रशासक होती. आपल्या राज्यातील जल, जमीन जंगल याचे रक्षक करणारी ती ताडकावनाची राणी होती. प्रसंगी स्वतः रणांगणात उतरून बाह्य शक्तींशी लढा देणारी ही राणी अफाट शारीरिक आणि मानसिक बळाचे प्रतीक असल्याचे दाखले प्राचीन ग्रंथही देतात. यामुळे बेडग येथील ताटिकेच्या सोंगाकडे लोकसंस्कृतीचा एक वारसा म्हणून पाहणेच उचित ठरेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.