व्यक्तिनामा : आकाशापलीकडील स्वप्नांची गोष्ट!
esakal April 13, 2026 09:45 AM

मंजूषा कुलकर्णी

‘आर्टिमिस २’ मोहिमेद्वारे पृथ्वीपासून अंतराळात सर्वांत दूर जात चंद्राच्या अंधाऱ्या भागाला प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम ख्रिस्तिना कोच, रीड वाइजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, आणि कॅनडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन यांनी केला. या मोहिमेदरम्यान चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या भागात ‘ओरायन’ पोहोचले. पृथ्वीपासून एकूण दोन लाख ५२ हजार ७६० मैल अंतरापर्यंत जाण्याचा विक्रमही या यानाने केला. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर सुखरूप परतणाऱ्या पथकातील ख्रिस्तिना कोच पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या. त्यांची कथा ही केवळ अंतराळ गाठण्याची नाही, तर स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

अंतराळभ्रमण ऐकायला जितके आकर्षक वाटते, तितकेच प्रत्यक्षात ते धोकादायकही असते. अशा धोक्यांना सामोरे जात अंतराळवीरांना अनेकदा अशी कामे करावी लागतात, ज्याची कल्पना आपण पृथ्वीवरील लोकांनी कदाचित कधीच केलेली नसते. असेच एक काम ‘नासा’च्या या मानवी चांद्रयान मोहिमेत सहभागी झालेल्या ख्रिस्तिना कोच यांनी ओरायन अंतराळयानात केले. अंतराळात उड्डाण करत असताना त्यांच्या अंतराळयानातील शौचालय बिघडल्यावर कोच यांनी ते स्वतःच दुरुस्त केले. या कामगिरीनंतर आता जगभरात त्यांना प्रेमाने ‘स्पेस प्लंबर’ असे संबोधले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना ख्रिस्तिना यांनीही या बिरुदाबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

अमेरिकेतील मिशिगन राज्यात १९७९ मध्ये जन्मलेल्या ख्रिस्तिनाचे बालपण नॉर्थ कॅरोलिनामध्ये गेले. लहानपणापासूनच त्यांना आकाश, तारे आणि विज्ञान यांचे आकर्षण होते. त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या या जिज्ञासेला प्रोत्साहन दिले. शाळेत असतानाच त्या अभ्यासू, जिद्दी आणि कुतूहलपूर्ण विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. ‘नासा’पर्यंतचा त्यांचा प्रवास सरळ नव्हता. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी आणि भौतिकशास्त्रात शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी कठीण आणि प्रतिकूल वातावरणात काम करण्याचा मार्ग निवडला.

कोच यांनी २००४ ते २००७ या काळात ‘युनायटेड स्टेट्स अंटार्क्टिक प्रोग्राम’मध्ये संशोधन सहयोगी म्हणून काम केले. या काळात त्यांनी आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशात साडेतीन वर्षे संशोधन केले. अमेरिकेच्या ‘अमुंडसेन-स्कॉट साऊथ पोल स्टेशन’ या पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवावरील केंद्रावर हिवाळ्याचा एक पूर्ण हंगाम त्या तिथे राहिल्या. जिथे तापमान उणे ७९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली असे. याशिवाय त्यांनी अंटार्क्टिकावरील ‘पामर स्टेशन’वरही काम केले. अंटार्क्टिकामध्ये असताना त्यांनी अग्निशमन दल आणि महासागर/हिमनदी शोध व बचाव पथकांमध्ये सेवा केली. दक्षिण ध्रुवावरील आपला अनुभव मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचे सांगताना कोच म्हणतात, ‘‘सूर्याचे दर्शन न घेता, एकाच चमूच्या सोबतीने आणि कुठलाच संवाद किंवा ताज्या अन्नाशिवाय अनेक महिने वास्तव्य करताना एकाकीपणा, कुटुंब आणि मित्रांची उणीव आणि नवीन संवेदनेचा अभाव अशा परिस्थितीत राहावे लागते. स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला विशिष्ट रणनीती शोधावी लागते.’’ या अनुभवांनी कोच यांचा मानसिक आणि शारीरिक ताकद अधिकच वाढवली.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने कोच यांनी २०१३ मध्ये अंतराळवीर म्हणून निवड केल्यानंतर कोच यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. त्यांनी २०१९मध्ये पहिल्यांदा अंतराळात झेप घेतली आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) दीर्घकाळ वास्तव्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी तब्बल ३२८ दिवस अंतराळात घालविले. एका महिलेकडून सर्वाधिक सलग अंतराळात राहण्याचा विक्रम कोच यांनी प्रस्थापित केला. कोच या आता ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी ‘आर्टिमिस २’ मोहिमेचा भाग आहेत. या मोहिमेद्वारे मानवाने ५० वर्षांनंतर पुन्हा चंद्राभोवती प्रवास केला. कोच यांची ही यशस्वी मोहीम केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नाही, तर चंद्रावरच्या मानवी वसाहतींच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वाची होती.

‘आयएसएस’वरील वास्तव्याच्या काळात कोच यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग केले, अंतराळात चालण्याच्या (स्पोसवॉक) मोहिमा पूर्ण केल्या. इतिहासातील पहिला पूर्णपणे महिलांचा ‘स्पेसवॉक’ त्यांनी सहकारी अंतराळवीर जेसिका मीर यांच्यासह पूर्ण केला. या कामगिरीने जगभरातील महिलांसाठी नवे ‘आकाश’ खुले झाले. ख्रिस्तिना यांचा प्रवास केवळ यशाचा नाही, तर त्यागाचाही आहे. दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहणे, पृथ्वीपासून लाखो किलोमीटर अंतरावर काम करणे आणि सतत धोका पत्करणे हे सगळे त्यांनी शांतपणे आणि धैर्याने आणि आनंदाने केले. बालपणी ताऱ्यांकडे पाहण्याच्या स्वप्नापासून ते चांंद्रमोहिमेपर्यंतचा प्रवास हा प्रत्येकासाठी दीपस्तंभ आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.